‘एमआयडीसी’मध्ये उद्योग वाढीसाठी प्रयत्न करणार – आमदार हेमंत ओगले

Mahesh Waghmare
Published:

श्रीरामपूर : एमआयडीसी मधील प्रश्नाबाबत आपण गंभीर असून मोठे उद्योग श्रीरामपूरात कसे येतील, यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन आमदार हेमंत ओगले यांनी केले. येथील एमआयडीसीतील कार्यालयात अधिकाऱ्यांसमवेत नुकतेच उद्योजकांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते

आमदार ओगले म्हणाले की, २२० केव्हीचे उच्च दाब वीज स्टेशनचे काम लवकरच चालू होणार असून यासाठी आपण महापारेषणचे व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांची मुंबई येथे भेट घेतली आहे. तसेच फायर स्टेशनच्या प्रस्तावाला देखील लवकरच मंजुरी मिळेल.

एमआयडीसी मधील होणाऱ्या चोऱ्या आणि गुन्हेगारीकडे देखील अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले, यासाठी एमआयडीसी परिसरात सीसीटीव्ही लावण्याच्या सूचना देखील केल्या. तसेच अनेक वर्षांपूर्वी बसविलेले पथदिवे देखील बदलण्याचा प्रस्ताव सादर करण्याचे अधिकाऱ्यांना आदेशित केले.

करण ससाणे म्हणाले की, अनेक प्रतिकूल परिस्थितीवर मात करत श्रीरामपूर एमआयडीसीतील उद्योजकांनी आपला उद्योग सांभाळत अनेकांना रोजगार निर्मिती करून दिली आहे.

उद्योजकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आमदार हेमंत ओगले यांनी लक्ष घातले. आमदार ओगले हे पहिल्या दिवसांपासूनच एमआयडीसीमध्ये मोठे उद्योग कसे येतील, यासाठी प्रयत्नशील असल्याचे ससाणे यांनी सांगितले.

याप्रसंगी जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सचिन गुजर म्हणाले की, माजी आमदार स्व. जयंतराव ससाणे तसेच यापूर्वीच्या अनेक लोकप्रतिनिधींनी एमआयडीसी वाढीसाठी विशेष प्रयत्न केले. विज, पाणी, रस्ते, सुरक्षता अशा मूलभूत सोयींकडे अधिकाऱ्यांनी सकारात्मक भूमिका घेतल्यास निश्चितच येणाऱ्या काळात श्रीरामपूर एमआयडीसीमध्ये नवीन उद्योगधंदे येतील.

जिल्हा परिषदेचे माजी सभापती बाबासाहेब दिघे यांनी देखील एमआयडीसीच्या प्रश्नांकडे आमदार ओगले व अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष अण्णासाहेब डावखर, सेवादल काँग्रेसचे प्रमुख रावसाहेब आल्हाट यांच्यासह एमआयडीसीचे सहाय्यक क्षेत्र व्यवस्थापक टेकाळे, सहाय्यक व्यवस्थापक सोनटक्के उपअभियंता बडगे, उपअभियंता थोटे, महावितरणचे माळी, सहाय्यक पोलीस निरीक्षक मगरे उपस्थित होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe