टाकळी ढोकेश्वर : संगमनेर येथील वन विभागातील कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयत्नाने खडकवाडी येथील नरभक्षक बिबट्या अखेर जेरबंद झाला आहे. बिबट्या नर जातीचा आहे. खडकवाडी गावातील गणपती मळा परीसरात या बिबट्यास जेरबंद करण्यासाठी वन विभागाने शुक्रवारी सकाळपासून युद्धपातळीवर मोहीम सुरु केली होती. अखेर दुपारी ३.३० वाजता त्यास जेरबंद करण्यात यश आले.
दरम्यान, त्या अगोदर काल खडकवाडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात ईश्वरी पांडुरंग रोहकले (वय ९ रा. खडकवाडी, ता. पारनेर) या मुलीचा मृत्यू झाला होता. गुरुवारी सायंकाळी ७.१५ च्या सुमारास घराच्या जवळच लघुशंकेसाठी गेलेल्या नऊ वर्षीय मुलीचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला
ईश्वरीचे वडील पांडुरंग रोहकले गुरुवारी सायंकाळी सात वाजता घरासमोरील पडवीमध्ये जेवण करत बसले असताना मुलगी ईश्वरी हिने घराबाहेर लघुशंकेसाठी गेली असता त्याचवेळी घराच्या शेजारी असलेल्या मका पिकात दबा धरून बसलेल्या बिबट्याने या लहान मुलीवर हल्ला केला व तिला मक्याच्या शेतामध्ये ओढत घेऊन गेला.
तिचा आरडाओरडा पडवीत बसलेल्या वडिलांनी ऐकला व त्यांनी मक्याच्या शेतात बॅटरी लावून पाहिले त्यांना नरभक्षक बिबट्या मुलीच्या जवळ दिसला. वडिलांनी बिबट्याचा प्रतिकार करत तिची सुटका केली त्यानंतर बिबट्याने तेथून पळ काढला
या हल्ल्यात मुलगी गंभीर जखमी झाल्याने तिला टाकळी ढोकेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले परंतु तिच्या तपासणी नंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. सदर मृत मुलीवर शुक्रवारी सकाळी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या लहान शाळकरी मुलीच्या दुदैवी निधनाने ग्रामस्थांनी हळहळ व्यक्त केली.
उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरीतील सहाय्यक वनरक्षक गणेश मिसाळ, टाकळी ढोकेश्वरचे वनपरीक्षेत्र अधिकारी अनिल रहाणे, वनपाल किशोर गांगर्डे, सचिन गांगर्डे, संतोष पारधी, गजानन
पवार, संतोष बोऱ्हाडे, राजेंद्र रायकर, सचिन शहाणे, रामचंद्र अडागळे, मदन गाडेकर, राजेंद्र घुगे, समाधान चव्हाण, अंकाराज जाधव, ताराचंद गायकवाड या मोहिमेत सहभागी होते. बिबट्यास पकडताना वन कर्मचारी किरण साबळे जखमी झाले आहेत.
आ. काशिनाथ दाते हे घटनास्थळी उपस्थित रहात सुचना केल्या. यावेळी सुजितराव झावरे यांनी खडकवाडी येथे जात रोहकले कुटुंबाची भेट घेत सांत्वन केले व वन विभागाने या बिबट्याला लवकरात लवकर पकडावे व रोहोकले कुटुंबियांना तात्काळ शासकीय मदत देण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली.यावेळी उपसरपंच शरद गागरे, शरद काका पाटील, शिवाजी शिंगोटे, सुभाष शिंदे, दिलीप पाटोळे, बाळासाहेब झावरे, किसन आहेर आदी उपस्थित होते.