२३ जानेवारी २०२५ पाथर्डी : पैठण पंढरपूर रस्ता, शेवगाव शहर बाह्यवळण रस्ता व खरवंडी ते नवगणराजुरी रस्ता, या तीनही रस्त्यांची कामे मार्गी लागावी, यासाठी आ. मोनिकाताई राजळे यांनी मुंबई येथे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्यासोबत व प्रमुख अधिकाऱ्यांसह बैठक घेऊन चर्चा केली, त्यामुळे वरील तिनही रस्त्यांची कामे लवकरच मार्गी लागतील,अशी माहिती आ. राजळे यांनी दिली.
याबाबतची बैठक मुंबई येथे पार पडली आहे.राष्ट्रीय महामार्ग क्र. ७५२ ई- पैठण-पंढरपुर (पालखी मार्ग) व राष्ट्रीय महामार्ग क्र. ३६१ एफ (खरवंडी-नवघण राजुरी) या महामार्गाच्या पाथर्डी व शेवगाव तालुक्यातील भू – संपादनातील शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवून,कामे पूर्ण होण्यासाठी तसेच शेवगाव शहर बाह्यवळण रस्ता तातडीने होण्यासाठी दि. २२ जानेवारी रोजी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या समवेत बांधकाम भवन, मुंबई येथे बैठक झाली.
या वेळी बांधकाम सचिव संजय दसपुते, राष्ट्रीय महामार्ग मुख्य अभियंता संतोष शेलार, अधिक्षक अभियंता भरतकुमार बावीस्कर, राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंता सूर्यकांत गलांडे, उपविभागीय अधिकारी प्रसाद मते, शाखा अभियंता गजानन सिदलांबे, पी. व्ही. आर. कंपनीचे नायडू तसेच खरवंडी-नवघण राजुरी महामार्गाचे ठेकेदार एस.बी. शेख आदी उपस्थित होते.
या वेळी राष्ट्रीय महामार्ग क्र. ७५२ ई (पैठण-पंढरपूर पालखी मार्ग) या महामार्गावरील भालगांव २, मिडसांगवी, कासाळवाडी, या गावांचे भूसंपादनाचे अनुदान अद्याप उपलब्ध झाले नाही.तसेच शेकटे खुर्द, लाडजळगांव, बोधेगांव,हातगांव, मुंगी १ व मुंगी २ येथील संपादीत करावयाच्या जमिनीचे शोध अहवाल व समंतीपत्र प्राप्त नाही, त्यामुळे निवाडे झाले नसून भूसंपादन प्रक्रिया पूर्ण न झाल्याने रस्त्यांची काम अपूर्ण आहेत.
ही कामे पूर्ण होण्यासाठी मंत्री महोदयांनी संबंधितांना सूचना दिल्या.त्याचबरोबर राष्ट्रीय महामार्ग क्र. ३६१ एफ (खरवंडी-नवघण राजूरी मध्ये खरवंडी, मालेवाडी, मुंगुसवाडे, कासाळवाडी, भालगांव या गावांचा समावेश असून भूसंपादन मोबदला रक्कम मागणी १३ कोटी ४८ लाख होती.पैकी ७ कोटी ९० लाख मोबदला रक्कम प्राप्त होणे बाकी आहे.
सदर उर्वरीत मोबदला मिळण्यासाठी तसेच रस्त्याचे कामे दर्जेदार होण्यासाठी सूचना दिल्या.तसेच येथील निवाडयामधील त्रुटी दुरुस्ती संदर्भात मा. जिल्हाधिकारी यांचेकडे लवाद अर्ज सादर करण्यात आला आहे.सदर लवाद अर्ज निर्णय होणे बाकी असल्यामुळे पुढील प्रक्रिया झालेली नाही, त्यामुळे रस्त्यांची काम अपूर्ण असून, शेतकरी व ग्रामस्थांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे मंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून दिले.
यासंदर्भात दोनही महामार्गाच्या भूसंपादनाचा मोबदला रक्कम व अडचणींबाबत ना. नितीन गडकरी, केंद्रीय रस्ते मंत्री, यांच्याबरोबर बैठक घेण्याचे मंत्री महोदयांनी सांगितले.त्याचबरोबर शेवगाव शहर बाह्यवळण रस्त्याचे सर्वेक्षण झाले असून, भूसंपादनासाठी निधी उपलब्ध करुन देऊन बाह्यवळण रस्त्याचे काम तातडीने होण्यासाठी सकारात्मक चर्चा या वेळी झाली.
आ. मोनिकाताई राजळे यांनी यासाठी पाठपुरावा केला आहे.लवकरच या कामाला गती मिळेल व तीनही ठिकाणच्या रस्त्यांची कामे पूर्ण होऊन दळणवळणासाठी सोयीस्कर होईल,असे आ. राजळे यांनी सांगितले.