२९ जानेवारी २०२५ : अहिल्यानगर : आजपासून अहिल्यानगर शहरात सुरू होणारी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी वाडियापार्क मैदानावर उभारण्यात आलेली स्व.बलभीमअण्णा जगताप क्रीडा नगरी सजली आहे.मैदानावर राजवाड्याच्या प्रतिकृतीचे आकर्षक व भव्य प्रवेशद्वार उभारले आहे. आतमध्ये किल्ल्याच्या बुरुजाच्या प्रतिकृतीचे भव्य व्यासपीठ उभारले आहे. त्यावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची पूर्णाकृती प्रतिमा तसेच जिजामाता व छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, पालकमंत्री राधाकृष्ण विखे, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांचे पोट्रेट लावले आहेत.
मैदानात चहूबाजूला स्पर्धेचे संयोजक आ.संग्राम जगताप माजी खासदार सुजय विखे यांचे पोस्टर लावले आहेत. मुख्य व्यासपीठावर १०० प्रमुख पाहुण्यांची आसन व्यवस्था करण्यात आली आहे. मुख्य व्यासपीठा शेजारी दोन व्हीआयपी व्यासपीठ उभारण्यात आले असून त्या ठिकाणी प्रत्येकी ५० व्हीआयपी मान्यवरांची आसन व्यवस्था करण्यात आली आहे. स्टेज समोरील रेसलिंग प्लॅटफॉर्मवर मातीचे व गादीचे चार आखाडे तयार करण्यात आले असून त्या भोवती आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
महाराष्ट्र केसरी स्पर्धेस बुधवारपासून प्रारंभ होणार असून सकाळी राज्यातून आलेल्या मल्लांचे गटाप्रमाणे वजन घेण्यास सुरुवात होणार आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलीस उपाधीक्षक अमोल भारती यांनी मैदानाची व परिसराची पाहणी केली करून जिल्हा कुस्तीगीर संघाच्या पदाधिकाऱ्यांना महत्त्वपूर्ण सूचना केल्या. यावेळी कोतवालीचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे आदींसह पोलीस अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.