३० जानेवारी २०२५ अहिल्यानगर : जिल्ह्यात अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या घटना वाढु लागल्या आहेत.तीन दिवसांत अल्पवयीन मुलींवर अत्याचाराचा प्रयत्नाच्या दोन घटना अकोले तालुक्यात घडल्या आहेत. या घटनेत एकीने मारली चालत्या गाडीवरून उडी तर दुसरीने आरडाओरडा केला.त्यामुळे पुढील अनर्थ टळला.प्रजासत्ताक दिनाच्या आदल्या दिवशी घडलेल्या घटनेतील आरोपीला पोलिसांनी काही तासात अगस्ती कारखान्यावरुन अटक केली, तर दुसऱ्या घटनेतील आरोपीला राहत्या घरातून अटक केली आहे.
अकोले तालुक्यातील अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असुन पालक वर्गात चिंतेचे वातावरण आहे.याबाबत पोलिसांकडुन मिळालेल्या माहिती नुसार अकोले तालुक्यातील एका गावात प्रजासत्ताक दिनाच्या पुर्वसंधेला म्हणजेच २५ जानेवारी २०२५ रोजी शनिवार असल्याने शाळा दुपारी सुटल्यानंतर इयत्ता चौथीत शिकत असलेली ९ वर्षाची अल्पवयीन मुलगी वडिलांना येण्यास उशिर झाल्याने पायी घरी जात होती.
यावेळी आरोपींनी वडिलांची ओळख सांगत तिला गाडीवर बसवले.पुढे ओढ्याजवळ गाडी थांबवून तिला रस्त्यापासून आतील बाजूला नेले व तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला.यावेळी मुलीने आरडाओरड केल्याने आरोपीने तेथून पळ काढला.
या प्रकरणी पोलिसांनी काही तासातच आरोपी योगेश भाऊसाहेब शेणकर (वय ३५ वर्षे, रा. कारवाडी, कारखाना रोड, अकोले) यास अगस्ती सहकारी साखर कारखाना येथून मध्यरात्रीच्या सुमारास अटक केली.दुसरी घटना अकोले तालुक्यातीलच दुसऱ्या एका गावात घडली. १२ वर्षे ५ महिने वयाच्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग करुन अत्यचाराचा प्रयत्न करण्यात आला.
ती घरी जात असताना शुभम ऊर्फ तुकाराम शशिकांत निकाळे (वय २३) याने ‘तुला तुमच्या रस्त्यापर्यंत सोडतो’, असे म्हणून मोटारसायकलवर बळजबरीने मागे बसवले.जोराने गाडी चालवून न थांबता पुढे गाडी नेली.
गाडी चालू असतानाच त्याने मुलीचा विनयभंग केला.मुलीने घाबरुन गाडीवरून उडी मारल्याने तिच्या डोक्यास, गालाला व दोन्ही गुडघ्यांना मार लागला.याप्रकरणी निकाळे याच्या विरूद्ध अकोले पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला त्याच्या घरातून अटक करण्यात आली आहे.