इतना सन्नाटा क्यूं था भाई ? मतं गेली कुठे ? विधानसभा निकालावर मनसे प्रमुख राज ठाकरेंकडून संशय

Sushant Kulkarni
Published:

३१ जानेवारी २०२५ मुंबई : लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे १३, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे ८ उमेदवार निवडून येऊनही विधानसभा निवडणुकीत त्यांचे अनुक्रमे फक्त १५ आणि १० आमदार निवडून येतात.अजित पवार यांच्या पक्षाचा एकच खासदार निवडून येऊनही विधानसभेला त्यांचे ४१ आमदार निवडून कसे येतात ? ४ महिन्यांत लोकांत इतका फरक कसा पडतो हे सर्व अनाकलनीय असून संशोधनाचा विषय आहे, या शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी गुरुवारी विधानसभा निवडणुकीच्या निकालावर संशय व्यक्त केला.

माजी आमदार राजू पाटील यांना त्यांच्याच गावात शून्य मते मिळाली. याचा अर्थ लोकांनी आपल्याला मतदान केले, पण ते गायब केले गेले, असा होतो. मनसैनिकांनी निराश होऊ नये; जे आले, ते कमरपट्टा घेऊन आले नाहीत असे सांगत त्यांनी मनसैनिकांना लढण्यासाठी खंबीर राहण्याचे आवाहन केले. राज ठाकरे यांनी गुरुवारी दुपारी वरळीतील एनएससीआय मधील डोम सभागृहात पक्षाच्या राज्यस्तरीय मेळाव्यात मार्गदर्शन केले. त्यावेळी त्यांनी अनेक शंका उपस्थित करत सद्य राजकारणाचे विश्लेषण केले.

ते म्हणाले, विधानसभा निवडणूक निकाल लागल्यावर महाराष्ट्रभर सन्नाटा पसरला. राज्यातील लोकांनाच हा निकाल पटला नाही, समजलाही नाही. माझ्याकडे संघ परिवाराशी संबंधित एक व्यक्ती आली होती त्याने म्हंटले ‘इतना सन्नाटा क्यों है भाई? कोई तो जिता होगा… मग जल्लोष का नाही ?’ जे निवडून आले, सत्तेत बसले, त्यातील अनेकांचे मला फोन आले. सगळ्यांनाच आश्चर्य वाटत होते.

भाजपला १३२ जागा मिळाल्या, हे एकवेळ आपण समजू शकतो. कारण याआधी त्यांच्या १०५ आणि १२२ जागा आल्या होत्या. पण अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला विधानसभेला ४-५ पाच जागा मिळतील की नाही, असे वाटत असताना ४१ जागा मिळतात, यावर कुणाचा तरी विश्वास बसेल का? अजित पवार, भुजबळ ज्यांच्या जिवावर मोठे झाले, त्या शरद पवार यांना विधानसभा निवडणुकीत १० जागा मिळतात, ही न समजण्यापलीकडची गोष्ट आहे.

राजू पाटील यांच्या गावात १ हजार ४०० लोक राहतात. त्यांना तिथे एकही मत पडले नाही. हे कसे शक्य आहे ? ज्या गावात यापूर्वी पाटील यांना मोठ्या प्रमाणात मते पडायची, त्या त्यांच्या गावात एकही मत मिळाले नाही! काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात सात वेळा मोठ्या मताधिक्याने निवडून आले; पण या निवडणुकीत १० हजार मतांनी पडले, याबद्दल आश्चर्य व्यक्त करून राज ठाकरे यांनी मतदान यंत्रावर संशय घेतला.

आपल्याला मतदान झाले; पण ते कुठेतरी गायब झाले. त्यामुळे लोकांनी विचारल्यावर भांबावून जाऊ नका. हे चांगले लक्षण नाही. अनेक पत्रकार राजकीय पक्षांच्या दावणीला बांधले गेले आहेत. ते तुम्हाला भांबावून टाकतात. त्यामुळेच आज तीन महत्त्वाच्या गोष्टी सांगण्यासाठी मी येथे आलो आहे, असे मनसैनिकांना सांगून ते म्हणाले, हा जाणीवपूर्वक केलेला प्रचार असतो

तिथे खमके व्हा. ‘राज ठाकरे सारखी भूमिका बदलतात’ असा आक्षेप घेतला जातो. पण भाजपपासून, शरद पवार, शिवसेनेनेही अनेक वेळा भूमिका बदलल्या आहेत. मी अनेक पराभव पाहिले; पण खचलो नाही आणि विजयाने हुरळून गेलो नाही. मला खचलेल्यांचे नेतृत्व करायचे नाही. भाजपने ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले, ते सर्व आज त्यांच्यासोबत आहेत. आरोप केलेले सर्व लोक भाजपच्याच सरकारमध्ये मंत्री आहेत. ‘७० हजार कोटींचा घोटाळा करणाऱ्यांना आत टाकू’ असे मोदी म्हणाले होते. पण मला हे माहिती नव्हते की मोदी घोटाळा करणाऱ्यांना तुरुंगात टाकण्याऐवजी मंत्रिमंडळात टाकतील !

नेते, पदाधिकाऱ्यांसाठी आचारसंहिता

पक्षात शिस्त आणण्यासाठी नेते आणि पदाधिकाऱ्यांसाठी आचारसंहिता आणणार असल्याचे सांगून ठाकरे म्हणाले, मी जी भूमिका घेईन ती नेत्यापासून, पदाधिकारी ते मनसैनिकापर्यंत नेमकेपणाने पोहोचली पाहिजे, पक्षातील नेत्यांसाठी, पदाधिकाऱ्यांसाठी आणि कार्यकर्त्यांसाठी वेगवेगळी संहिता असेल. यात काही पदांची नावे बदलली जातील. पक्षाने जनतेसाठी आतापर्यंत जी कामे केली, आंदोलने केली, याची माहिती लोकापर्यंत घेऊन जा. खंबीर राहा, असा मंत्र त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe