१ फेब्रुवारी २०२५ नवी दिल्ली : गेल्या दहा वर्षांपासून दिल्लीवर सत्ता गाजवणाऱ्या आम आदमी पक्षामुळेच (आप) दिल्लीचा विकास खुंटला आहे,अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी केली.आपकडून दिल्ली शहराचा ‘राजकीय एटीएम’ म्हणून वापर करण्यात आला.म्हणून,अशा भ्रष्ट लोकांना सत्तेतून हद्दपार करीत दिल्लीच्या चौफेर विकासासाठी भाजपच्या ‘डबल इंजिन’ सरकारला निवडून देण्याचे आवाहन त्यांनी केले.
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी द्वारका येथे प्रचारसभा घेतली.यावेळी त्यांनी आम आदमी पक्षाचा उल्लेख ‘आप-त्ती’ असा करीत जोरदार हल्ला चढवला.यावेळी मोदी म्हणाले की, भाजप दिल्लीला आधुनिक बनवू इच्छिते आणि केंद्राचे येथे भव्य यशोभुमी बांधले असून, यात आधुनिकतेची झलक दिसून येते.
आम आदमी पक्षाने इतर राज्यातील आपल्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी दिल्लीला ‘राजकीय एटीएम’ बनवले असून, दिल्लीला अक्षरशः लुटले आहे. ते दिल्लीकरांच्या खिशातून पैसे काढत आहेत.येथील पैसा इतर राज्यात वापरला जात आहे.आपने राज्यकारभार चालवण्याऐवजी सतत केंद्राशी भांडण केले.
गेल्या काही वर्षांपासून ते फक्त उत्तर प्रदेश, हरयाणा आणि केंद्राशी लढत आहेत. जर असे लोक दिल्लीवर राज्य करत राहिले तर शहर मागे राहील, असा इशारा मोदींनी दिला.दिल्लीत भाजपचे सरकार येताच आम्ही आपच्या भ्रष्टाचाराची पोलखोल करणार आहोत यात दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार असल्याचे मोदींनी ठणकावले.