१ फेब्रुवारी २०२५ पुणतांबा : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने १४.९५ टक्के भाडेवाढ केल्यामुळे ग्रामीण भागातील महिलांसह प्रवासी वर्ग मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.या भाडेवाढीने महिला, विद्यार्थी, नोकरदार आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.राज्यातील एसटी महामंडळाच्या लालपरी बसेस ग्रामीण भागातील गोरगरीब प्रवाशांची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जातात.
दैनंदिन प्रवासासाठी हजारो नागरिक या बस सेवांचा उपयोग करतात.इयत्ता अकरावी-बारावीतील विद्यार्थिनींसाठी मोफत पास,महिलांसाठी अर्धे तिकीट आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत प्रवास योजना सुरू आहे.मात्र,अचानक १४.९५ टक्के भाडेवाढ झाल्यामुळे या सवलतींचा प्रभाव कमी होत असून,सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक गणित बिघडले आहे.
सध्या अनेक एसटी बसेस सुस्थितीत नाहीत,त्यामुळे महिलांना, विद्यार्थी वर्गाला आणि प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.अशा परिस्थितीत शासनाने प्रवाशांसाठी चांगल्या सुविधा पुरवण्याऐवजी भाडेवाढ लादली आहे,असा संताप व्यक्त केला जात आहे.महागाईने आधीच सामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले असताना एसटीच्या भाडेवाढीने त्यांना आणखी मोठा आर्थिक फटका बसणार आहे.त्यामुळे राज्य परिवहन महामंडळाने ही भाडेवाढ तातडीने मागे घ्यावी आणि प्रवाशांसाठी उत्तम सेवा उपलब्ध करून द्यावी,अशी मागणी महिलांसह सर्वसामान्य नागरिक करत आहेत.