३ फेब्रुवारी २०२५ नवी दिल्ली : आगामी ५ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत झोपडपट्टी व आर्थिकदृष्ट्या दुबळ्या वर्गाला मताधिकारापासून वंचित ठेवण्याचा कट रचण्यात येत आहे,असा आरोप आम आदमी पक्षाचे (आप) राष्ट्रीय निमंत्रक अरविंद केजरीवाल यांनी रविवारी केला.
एका व्हिडीओ संदेशात दिल्लीकरांना संबोधित करत माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, नोकरदारवर्गाचे निवासस्थान (क्वार्टर), धोबीघाट व झोपडपट्टी भागातील रहिवाशांना धमक्या देणारे फोन कॉल्स येत आहेत.प्रतिद्वंद्वी पक्षाचे लोक मतदारांना प्रत्येकी ३ हजारांचे आमिष दाखवत आहेत.
हे पैसे वाटणारे लोक नागरिकांची दिशाभूल करत आहेत. निवडणूक आयोगाचे लोक मतदारांच्या बोटाला अमिट शाई त्यांच्या घरीच लावून देतील,अशी बतावणी विरोधी गटातील लोक करत आहेत, हे ऐकून माझ्या अंगावर शहारे आले. हे गोरगरीब लोकांविरोधातील मोठे षड्यंत्र आहे.
म्हणून कोणीही अशा अवैध कारवायांमध्ये सामील होऊ नये, असे आवाहन केजरीवालांनी केले.जर तुम्ही चुकीने पैशांच्या बदल्यात बोटाला शाई लावून घेतली तर तुमच्या नावे बोगस मतदान केले जाईल.अशा घटनेत तुम्हाला अटक सुद्धा केली जाऊ शकते. फसवणुकीच्या प्रकरणात तुम्हाला ८ ते १० वर्षांची शिक्षा होईल, अशा शब्दांत केजरीवालांनी जनतेला सावध राहण्याचा सल्ला दिला आहे.