३ फेब्रुवारी २०२५ मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या किमान २० ते २५ आमदारांच्या गटावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नियंत्रण असून, हे आमदार शिंदेंच्या नव्हे तर फडणवीस आणि अमित शाह यांच्या सांगण्यावर सुरतला गेले होते,असा दावा शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. तसेच शिंदे यांच्या आमदारांमध्ये सध्या चलबिचल सुरू असून, पुन्हा मागे फिरण्याबाबत विचार सुरू आहे, असा दावाही राऊत यांनी केला आहे.
यासंदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले, भाजपकडून विधानसभा निवडणुकीनंतर शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्याचे वचन देण्यात आले होते; परंतु भाजपने तो शब्द पाळला नाही. निवडणुकीनंतर भाजपने त्यांना खड्यासारखं बाजूला केले.
मुख्यमंत्रीपदावरून डावलल्याने शिंदे अजूनही धक्क्यात आहेत.एक तर निवडणुकीत ५०-५५ जागा कशा मिळाल्या हा त्यांना पहिला धक्का आणि अमित शाह यांनी दिलेला शब्द पाळला नाही हा दुसरा धक्का त्यांना बसला आहे.
निवडणुका डोळ्यांसमोर ठेवूनच बजेट
केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पावर बोलताना राऊत म्हणाले, कागदावरील बजेटवरून लोकांना काय मिळणार हे बघण्यासाठी थोडा वेळ द्यायला हवा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रत्येक बजेट निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून केलेले असते.
भविष्यात बिहारमध्ये निवडणुका असल्याने तिथे योजनांचा वर्षाव करण्यात आला आहे, जिथे भाजपचे सरकार नाही.त्या राज्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. महाराष्ट्रातील मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना बजेट समजलेले नाही.आकडे आणि घोषणांवरून जाऊन चालत नाही ते जाणून घेण्यासाठी किमान ७२ तास लागतात.