Railway Stocks:- यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात रेल्वे क्षेत्रासाठी मोठ्या घोषणा होण्याची अपेक्षा होती. मात्र अर्थसंकल्पात रेल्वे संदर्भात विशेष तरतूद किंवा प्रकल्प जाहीर न झाल्याने या क्षेत्राशी संबंधित कंपन्यांचे शेअर्स मोठ्या प्रमाणात खाली आले. रेल्वे विकास निगम लिमिटेड (RVNL),
इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन (IRFC), IRCON इंटरनॅशनल लिमिटेड आणि रेलटेल कॉर्पोरेशन लिमिटेड यांसारख्या महत्त्वाच्या कंपन्यांना या घसरणीचा सर्वाधिक फटका बसला आहे. गुंतवणूकदारांमध्येही या घसरणीमुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून आगामी काळात या शेअर्समध्ये सुधारणा होईल का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
RVNL शेअर्समध्ये घसरण
RVNL म्हणजेच रेल्वे विकास निगम लिमिटेड या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये जवळपास ७% ची मोठी घसरण झाली. सोमवारी बीएसईवर हा शेअर ४०१.८० रुपयांपर्यंत खाली आला. गेल्या सहा महिन्यांत याच्या किमतीत तब्बल ३१% घट झाली आहे.
IRFC शेअरमधील घसरण
IRFC म्हणजेच इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशनच्या शेअर्सनेही गुंतवणूकदारांना निराश केले. IRFC चे शेअर्स १३७.४० रुपयांवर उघडले पण दिवसभरात १३३.४५ रुपयांपर्यंत खाली आले. रेल्वे कंपन्यांचे शेअर्स सतत घसरत असल्यामुळे गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे.
RITES लिमिटेड शेअरमध्ये घसरण
RITES लिमिटेड या रेल्वे क्षेत्रातील महत्त्वाच्या कंपनीच्या शेअर्समध्येही मोठी घसरण झाली आहे. सोमवारी सकाळी कंपनीचे शेअर्स २४३.५५ रुपयांवर उघडले. पण दिवसभरात ७.७% ने खाली येऊन २३२.५० रुपयांवर स्थिरावले. गेल्या एका वर्षात RITES च्या शेअर किमतीत तब्बल ३२% घट झाली आहे.
IRCON इंटरनॅशनलच्या शेअरमध्ये घसरण
IRCON इंटरनॅशनलच्या शेअर्सलाही याचा फटका बसला असून हे शेअर्स १९२.२० रुपयांवरून १८९.४० रुपयांवर आले. ही घट ५% पेक्षा अधिक आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये अस्वस्थता वाढली आहे.
रेल्वे कंपन्यांचे शेअर्स घसरण्याचे प्रमुख कारण
या घसरणीमागील प्रमुख कारण म्हणजे अर्थसंकल्पात अपेक्षित प्रकल्प किंवा गुंतवणुकीसाठी अधिक तरतूद न मिळणे.तसेच सरकारकडून मोठ्या निधीची अपेक्षा होती मात्र अर्थसंकल्पात रेल्वेसाठी कोणतीही ठोस घोषणा न केल्याने गुंतवणूकदारांमध्ये निराशा पसरली. परिणामी रेल्वे कंपन्यांचे शेअर्स मोठ्या प्रमाणात खाली आले.
आगामी काळात सरकार रेल्वे क्षेत्रासाठी कोणते धोरण ठरवते आणि गुंतवणुकीसाठी कोणते निर्णय घेतले जातात? यावर या शेअर्सच्या किमती अवलंबून असतील. जर सरकार खासगी गुंतवणूकदारांना रेल्वे क्षेत्रात अधिक संधी उपलब्ध करून दिल्या तर या शेअर्समध्ये पुन्हा तेजी येऊ शकते. मात्र सध्याच्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांनी सावध पावले उचलण्याची गरज आहे.