निवडणुकीपूर्वी मुंडे, कराड भेटले ! जरांगेंनी कथन केली घटना ; हार्वेस्टरचा विषय काढताच कराडने काढला पाय

Sushant Kulkarni
Published:

४ फेब्रुवारी २०२५ छत्रपती संभाजीनगर : विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील सर्वच जण अंतरवालीला येऊन भेटत होते.त्यावेळी धनंजय मुंडे हे सुद्धा येऊन भेटले होते.लक्ष राहू द्या, अशी विनंती त्यांनी केली होती,त्यावेळी त्यांच्या सोबत कराडही होता. मुंडे यांनीच त्याची ओळख करून दिली होती, त्यावर ‘ह्यो आहे का तो हार्वेस्टरचे पैसे बुडवणारा,’ असे मी त्याला पाहून म्हणालो होतो. हे ऐकून तो बाहेर निघून गेला, अशी आठवण मराठा योद्धा मनोज जरांगे यांनी सोमवारी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितली.

प्रकृती अस्वस्थ्यामुळे जरांगे यांच्यावर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सोमवारी त्यांनी रुग्णालयात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी मुंडे व कराड यांच्या भेटीची आठवण सांगितली. जरांगे म्हणाले की, माझ्या मराठ्याशिवाय कुणाचेही या राज्यात पान हलू शकत नाही, त्यामुळे सर्वच जण भेटायला येतात. त्यावेळी सात-आठ दिवसांपासून मुंडे यांना भेटायचे आहे, असा निरोप येत होता.

एका रात्री दोन वाजण्याच्या सुमारास धनंजय मुंडे भेटायला आले होते. मुंडे आणि कराड दोघेही होते. मुंडेंनी त्याची ओळख करून दिली, त्यावर मी हार्वेस्टरचा विषय काढताच तो बाहेर निघून गेला. निवडणुकीचा काळ आहे, लक्ष ठेवा, माझ्यावर अन्याय झाला होता, तेव्हा मराठ्यांनी मला मोठे केले, मराठ्यांची साथ मला पहिल्यापासून आहे, असे ते बोलले होते.

मी त्यांना काही शब्द दिला नाही. मी हो म्हटले नाही. पण इतक्या नीच वृत्तीची ही टोळी असेल, असे मला तेव्हा वाटले नव्हते. धनंजय मुंडेंची टोळी ही राज्याला व त्यांच्या समाजाला लागलेली कीड आहे. याच टोळीने त्यांच्या श्रद्धास्थानाला कलंक लावला आहे, असेही जरांगे म्हणाले.

यावेळी त्यांनी महंत नामदेव शास्त्री यांच्या विधानावरही प्रतिक्रिया दिली.आरोपींची मानसिकता तपासण्याचे,आरोपींचे समर्थन करणारे शब्द महाराष्ट्राने पहिल्यांदा ऐकले.त्यांच्या पोटातले ओठावर आले.ज्या ठिकाणाहून अपेक्षित नव्हते, तिथून जातीयवादाचा नवा अंक सुरू झाल्याचे महाराष्ट्राने पाहिले.

त्यामुळे संपूर्ण राज्य हळहळले.मी बाबाजींना दोष दिला नाही, ही करून घेणारी टोळी आहे, ती टोळी संपली पाहिजे. ओबीसींवरही अन्याय झाला. जात कोणतीही असली तरी अन्याय झाल्यावर लोकांनी व्यक्त झाले पाहिजे. आता लोक व्यक्त होत आहेत, असेही जरांगे म्हणाले.

आत्महत्या करू नका; भावनिक आवाहन

मराठ्यांच्या पोरांनो, आत्महत्या करू नका. मला तुमची गरज आहे. दम धरा, आरक्षण मिळेपर्यंत एक-दोन वर्षे रिपीट होऊ द्या. आई-बापासाठी, माझ्यासाठी तुम्ही गरजेचे आहात. माझे ऐका आत्महत्या करू नका, असे भावनिक आवाहनही जरांगे यांनी केले. तुम्हाला किती बळी पाहिजेत फडणवीस साहेब, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.जातीच्या लेकरांपेक्षा आम्हाला दुसरे काही नाही. गोरगरीबांच्या लेकरांनी काय केले ? घडाघड आत्महत्या करत आहेत.

तरीही तुम्हाला दयामाया येत नाही, गॅझेटच्या मागण्या पटकन मंजूर करा. तुमच्यामुळे आमची पोरं आत्महत्या करत आहेत. त्यांच्या बलिदानावर खेळू नका, अशी विनंतीही जरांगे यांनी फडणवीस यांना केली. जाणून बुजून मराठ्यांना वेठीस धरू नका, आरक्षणावर तातडीने मार्ग काढा, नसता आम्ही उग्र आंदोलन करू,असा इशाराही मनोज जरांगे यांनी दिला.

वडेट्टीवारांनाही दिले प्रत्युत्तर

प्रत्येक घटनेत जरांगे यांनी पुढे यायची गरज नाही,असे विधान काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केले,यावर प्रतिक्रिया देताना जरांगे यांनी वडेट्टीवारांचे कान टोचले. ते म्हणाले की, त्याला काही दम निघेना का,आम्ही त्यांना काही बोललो नाही.त्याने काय ठेका घेतला आहे का एकट्याने, गरीब शेतकरी, दलित, मुस्लिम, मराठे, ओबीसींच्या बाजूने बोलायचे नाही का, असा असतो का विरोधी पक्षनेता, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe