अमृतसर: अमेरिकेत अवैधरीत्या राहत असलेल्या महाराष्ट्रातील तिघांसह एकूण १०४ भारतीय नागरिक बुधवारी मायदेशी परतले आहेत. अमेरिकन वायुदलाच्या मालवाहू विमानाने या भारतीयांना अमृतसरमधील विमानतळावर आणण्यात आले. आव्रजन व इतर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्यांना त्यांच्या संबंधित राज्यात पाठवले जाणार आहे
अमेरिकेतील ट्रम्प प्रशासनाने अवैध स्थलांतरितांना बाहेरचा रस्ता दाखवण्याचा चंग बांधला आहे. त्यासाठी ठोस पावले उचलली जात आहेत. त्यानुसार हद्दपार केलेल्या १०४ भारतीयांना अमेरिकन वायुदलाचे सी-१७हे विमान अमृतसरमध्ये दाखल झाले आहे. यात, ७९ पुरुष व २५ महिलांचा समावेश आहे. यामध्ये गुजरात आणि हरयाणातील
![](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2025/02/Sमाधानकारक-पाऊस-झाला.-मान्सून-काळात-काही-ठिकाणी-अतिवृष्टी-देखील-झाली.-1.jpg)
प्रत्येकी ३३, पंजाबमधील ३०, महाराष्ट्र व उत्तर प्रदेशातील प्रत्येकी ३ आणि चंदीगडच्या दोघांचा समावेश आहे. अमेरिकेचे मालवाहू विमान या भारतीयांना घेऊन मंगळवारी निघाले होते. अमेरिकेत जवळपास १८ हजार अवैध भारतीय राहत असून, त्यांना मायदेशी पाठविण्याची तयारी ट्रम्प प्रशासनाने केली आहे. या मुद्द्यावर २७ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ट्रम्प यांच्यात सविस्तर चर्चा झाली होती. मोदींच्या १३-१४
फेब्रुवारीच्या अमेरिकन दौऱ्यापूर्वी या भारतीयांना मायदेशी पाठविण्यात आले आहे, असे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी प्रत्येक भारतीयाच्या वैध घरवापसीसाठी आपले सरकार तयार असल्याचे यापूर्वीच स्पष्ट केले होते. उल्लेखनीय बाब म्हणजे ट्रम्प यांनी गत महिन्यात अमेरिकेची सूत्रे हाती घेतल्यानंतर अवैध भारतीयांविरोधात केलेली ही पहिली कारवाई आहे.