मुळा नदीवर साकारतोय नवीन रेल्वे पूल ; दौंड-मनमाड मार्गावर दुहेरी वाहतूक सुरू होणार

Sushant Kulkarni
Published:

७ फेब्रुवारी २०२५ तांदुळवाडी : राहुरी रेल्वे स्टेशन येथील मुळा नदीवर आधुनिक तंत्रज्ञान वापरून नवीन रेल्वे पूल बांधण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. या ठिकाणी असलेल्या जुन्या काळातील सुमारे १०० वर्षापूर्वीच्या लोखंडी पूला शेजारी हा नवीन पूल तयार केला जात आहे.मागील महिन्यात ३ जानेवारी रोजी मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर धरमवीर मीना यांनी राहुरी रेल्वे स्टेशन येथील मुळा नदीवरील लोखंडी पूलाची पाहणी करून कामाचा आढावा घेतला होता.

सदरचे काम अंतिम टप्प्यात असून लवकरच सदर पूल रेल्वेच्या वाहतूकीसाठी सुरू केला जाणार असल्याचे दिसते.नवीन पूल रेल्वे वाहतूकीसाठी सुरळीत झाल्यानंतर राहुरी ते वांबोरी दरम्यानच्या रेल्वे लाईनच्या दुहेरी मार्गाची चाचणी करून दौंड-मनमाड या रेल्वे मार्गावरील दुहेरी वाहतूक सुरू केली जाणार असल्याचे दिसते.

दौंड-मनमाड हा रेल्वे मार्ग जिल्ह्यातील महत्वाचा भाग आहे.ग्रामीण भागातील प्रवासी रेल्वेने ये-जा करत असतात. जुन्या काळी प्रवास करण्यासाठी फक्त रेल्वे, बस, घोडा-गाडी, बैलगाडी, अशी वाहनेच उपलब्ध होती.त्यामुळे सातत्याने रेल्वे प्रवास करावा लागत असे.आता प्रवासी वाहतूक व्यवस्था चांगल्या प्रकारे उपलब्ध आहे.रेल्वे विभागाने देखील रेल्वे स्टेशनवर अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहे.

तसेच नियोजित गाड्यांची संख्या भविष्यात वाढती असल्याने केंद्र सरकारने नगर-मनमाड या रेल्वे मार्गावर दुहेरी लाईन करण्याचा निर्णय घेतलेला आहे.त्यामुळे अनेक ठिकाणी रेल्वेच्या दुहेरी करणाचे काम प्रगती पथावर सुरू आहे.त्यामुळे राहुरी रेल्वे स्टेशन येथील मुळा नदीवर जुन्या काळातील म्हणजे सुमारे १०० वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त जूना असलेल्या लोखंडी पूलाशेजारी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून नवीन पूल उभारला गेला असून या पूलाचे काम अंतिम टप्प्यात आहे.

राहुरी रेल्वे स्टेशन येथील मुळा नदीवर असलेल्या जुन्या काळातील पुलाचा मोठा इतिहास आहे.या पूलाची उभारणी, पायाभरणी, रेखीव बांधणी ही इंग्रज कालखंडातील आहे. सुमारे १०० वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला तरी सदर पूल हा कायम नवीन असल्याचा भास होतो. या पूलाचे काम पूर्ण झाले. त्यावेळी कोणतेही आधुनिक तंत्रज्ञान विकसित झालेले नव्हते. त्यामुळे जुने तंत्र वापरून हा पूल तयार झाला होता.

आता नवीन होणारा पूल व जूना पूल यामध्ये काही साधर्म्य असणार आहे. परंतु दोन्ही पूलांचा इतिहास मात्र नक्कीच वेगळा आहे. नवीन बांधला जात असलेला पुल हा जुन्या पुलाप्रमाणेच दिसणार आहे. जूना पूल हा मोठमोठ्या दगडाचा वापर करून बांधला गेला होता. तर नवीन पूल हा खोल पाण्यात कॉलम उभारून बांधला जात आहे.

राहुरी रेल्वे स्टेशन येथे मुळा नदीवरील रेल्वे पूलाचे काम पूर्ण झाल्यानंतर दौंड ते मनमाड या दुहेरी मार्गाची वाहतूक सुरू होणार असून त्यानंतर प्रमुख एक्स्प्रेस व पॅसेंजर रेल्वे गाड्यांना थांबा दिला जाणार असल्याचे समजते. राहुरी रेल्वे स्टेशन येथे प्रमुख गाड्यांना थांबा मिळावा, यासाठी रेल्वे सल्लागार समिती व ग्रामस्थांचा पाठपुरावा सुरू आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe