उद्धव ठाकरें समवेतच्या चर्चेनंतर किरण काळे शिवबंधन बांधण्याच्या तयारीत ; लवकरच मातोश्रीवर करणार प्रवेश

Sushant Kulkarni
Published:

१२ फेब्रुवारी २०२५ : माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे निकटवर्तीय म्हणून ओळख असणाऱ्या आक्रमक नेते किरण काळे यांनी काँग्रेसला राम राम ठोकला आहे. त्यानंतर काळे महायुतीतील घटक पक्षात प्रवेश करणार की महाविकास आघाडीतच राहणार याबद्दल चर्चा सुरू असताना शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समवेत काळेंची मातोश्रीवर सुमारे पाऊण तास प्रदीर्घ चर्चा झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

या चर्चेचा तपशील मात्र समजू शकला नाही. यावेळी प्रवक्ते खा. संजय राऊत देखील उपस्थित होते. ठाकरें समवेत झालेल्या चर्चेनंतर काळे हे शिवबंधन बांधणार असल्याची खात्रीलायक माहिती विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. लवकरच मातोश्रीवर त्यांचा प्रवेश होणार असल्याचे समजते आहे.

काळे यांनी दोन दिवसांपूर्वी काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्ष पदासह पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे काळे पुढील राजकीय भूमिका काय घेणार याकडे राजकीय धुरिणांचे लक्ष लागले आहे. शिवसेना उबाठातून काहींनी शिंदे सेनेत प्रवेश केल्यानंतर अहिल्यानगर शहरात आता पुन्हा शिवसेना बळकट करण्यासाठी मातोश्रीवरून हालचाली सुरू झाल्या आहेत.

काळेंसारखे आक्रमक नेतृत्व गळाला लावत त्या माध्यमातून शहरात शिवसेना पुन्हा मजबूत करण्यासाठी मुंबईतून घडामोडी सुरू आहेत.किरण काळे काँग्रेसमध्ये असताना देखील शिवसेना दिवंगत नेते स्व. अनिलभैय्या राठोड यांच्या विचारधारेवर काम करत होते. स्व. राठोड यांचे नाव अहिल्यानगर महापालिकेच्या जुन्या इमारतीला देण्याची मागणी त्यांनी केली होती.

त्यासाठी त्यांनी मोठे आंदोलन केले होते. त्यावेळी त्यांनी स्व. राठोड यांचे छायाचित्र मनपाच्या भिंतीवर चिकटवील्या वरून त्यांच्यावर मनपाने विद्रूपीकरणाचा गुन्हा दाखल केला होता.त्यामुळे काळे यांची सुरुवातीपासूनच स्व. राठोड यांच्या विचारांना पुढे नेत काम करण्याची कार्यपद्धती पाहता काँग्रेस मधून बाहेर पडल्यानंतर ते ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करतील असा कयास बांधला जात होता. त्यातच त्यांनी आता ठाकरेंची मातोश्रीवर भेट घेतल्यामुळे त्यांच्या शिवसेना प्रवेशावर शिक्कामोर्तब झाले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe