१८ फेब्रुवारी २०२५ मुंबई : राज्याचा सन २०२५ – २६ चा अर्थसंकल्प १० मार्च रोजी विधिमंडळात सादर केला जाईल.अर्थसंकल्पावरील सर्वसाधारण चर्चेसाठी दोन ; तर विभागवार मागण्यांवरील चर्चेसाठी पाच दिवस ठेवण्यात आले आहेत.अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पुरवणी मागण्या मांडल्या जातील.
या पुरवणी मागण्या दोन दिवसांच्या चर्चेनंतर मंजुरीसाठी सभागृहासमोर ठेवल्या जातील.अर्थसंकल्पीय अधिवेशन तीन आठवडे,म्हणजेच ३ ते २१ मार्च या कालावधीत होईल.राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला येत्या ३ मार्च पासून मुंबईत सुरुवात होत आहे.विधान मंडळाने या अधिवेशनासाठी तीन आठवड्यांचे तात्पुरते कामकाज निश्चित केले आहे.

त्यानुसार अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधिमंडळाच्या संयुक्त बैठकीत राज्यपालांचे अभिभाषण होईल.या अभिभाषणावर दोन दिवस चर्चा होईल. ७ मार्च रोजी पुरवणी विनियोजन मांडले जाईल. ८ आणि ९ मार्च रोजी अधिवेशनाला सुट्टी असेल.अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याच्या पहिल्या दिवशी, म्हणजे १० मार्चला राज्याचा अर्थसंकल्प मांडला जाईल.
दुसऱ्या दिवसापासून अर्थसंकल्पावर सर्वसाधारण चर्चा सुरू होईल.दुसऱ्या आठवड्यात १४ मार्च रोजी धुलिवंदनाची, तर १५ आणि १६ मार्चला शनिवार-रविवारमुळे अधिवेशनाला सुट्टी राहील.१७ ते २१ मार्च दरम्यान अर्थसंकल्पातील विभागवार मागण्यांवर चर्चेसह शासकीय कामकाज होईल.विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची लवकरच बैठक होईल,तेव्हा यावर शिक्कामोर्तब होईल.