Ahilyanagar Politics : अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या राहाता तालुक्यात शिवसेना (उद्धव ठाकरे गट) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटातील कार्यकर्त्यांमध्ये टोकाची चकमक उडाल्याने मोठा तणाव निर्माण झाला.
आणि वातावरण तापले….
शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नीलम गोऱ्हे यांनी दिल्लीतील एका साहित्य संमेलनात पक्षांतर्गत नियुक्त्यांवर गंभीर आरोप केले होते. त्यावर खासदार संजय राऊत यांनी परखड प्रतिक्रिया दिली. या विधानांमुळे शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी निर्माण झाली होती. याचा निषेध नोंदवण्यासाठी शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी राहाता येथे आंदोलन पुकारले. याचवेळी उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनीही संजय राऊत यांच्या प्रतिमेला अपमान करणाऱ्या कृतीची माहिती मिळाल्याने तेही आंदोलनस्थळी दाखल झाले आणि वातावरण तापले.

पोलिसांचा हस्तक्षेप
शिंदे गटाच्या आंदोलनाच्या ठिकाणी ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमकपणे पोहोचल्याने दोन्ही गटांमध्ये जोरदार घोषणाबाजी सुरू झाली. कार्यकर्त्यांची संतप्त प्रतिक्रिया आणि आक्रमक भूमिका पाहता, काही काळासाठी परिसरात मोठा तणाव निर्माण झाला.
तर कडक कारवाई…
सुदैवाने, राहाता पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत दोन्ही गटांना शांत करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी आंदोलकांचे निवेदन स्वीकारले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यांनी स्पष्ट इशारा दिला की, जर कोणत्याही गटाने कायदा हातात घेतला तर कडक कारवाई केली जाईल. पोलिसांच्या त्वरित कृतीमुळे पुढील संभाव्य मोठा संघर्ष टळला.
राऊतांविरोधात कारवाईची मागणी
शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी नीलम गोऱ्हे यांच्या समर्थनार्थ संजय राऊत यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. “राऊत यांनी असंसदीय भाषा वापरल्याने आम्ही निषेध करत आहोत आणि त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे,” अशी भूमिका त्यांनी मांडली.
गोऱ्हेंविरोधात ठाकरे गटाचा आक्रमक पवित्रा
दुसरीकडे, उद्धव ठाकरे गटानेही आक्रमक भूमिका घेत एकनाथ शिंदे आणि नीलम गोऱ्हे यांना ‘गद्दार’ संबोधले. त्यांनी दोघांनी शिर्डीत साईबाबांच्या समाधीवर हात ठेवून सत्यता सिद्ध करावी, असे आवाहन केले. “जर त्यांनी खोटी शपथ घेतली असेल, तर आमच्या महिला शिवसैनिक त्यांना योग्य उत्तर देतील,” असा इशारा ठाकरे गटाने दिला. त्यांनी गोऱ्हें विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.