Ahilyanagar Politics : श्रीरामपूर बाजार समितीच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत विरोधी विखे गटाने सभापती आणि प्रभारी सचिवांवर बेकायदेशीर कारभाराचा आरोप केला आहे. या पार्श्वभूमीवर आयोजित झालेल्या बैठकीस विखे गटाचे संचालक उपस्थित राहिले असतानाही सत्ताधारी गटाने त्यांना टाळण्याचा प्रयत्न केला, असा दावा करण्यात आला आहे.
बैठकीतून पळ काढला
विरोधी गटाच्या म्हणण्यानुसार, बाजार समितीच्या मासिक बैठकीसाठी 22 फेब्रुवारी 2025 रोजीची बैठक तहकूब झाल्यानंतर ती 25 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 5 वाजता आयोजित करण्यात आली होती. या वेळी विखे गटाचे संचालक वेळेवर पोहोचले, मात्र सत्ताधारी गटाने त्यांना पाहून बैठक स्थगित करण्याचा प्रयत्न केला. यामुळे विरोधाचा अधिकार नाकारला गेला, अशी तक्रार त्यांनी जिल्हा उपनिबंधक आणि सहाय्यक उपनिबंधकांकडे केली आहे.

वादग्रस्त विषय
विरोधी गटाने विषय पत्रिकेतील क्रमांक 7 आणि 8 या मुद्द्यांवर विशेष आक्षेप घेतला आहे. हे मुद्दे श्रीरामपूर आणि बेलापूर उपबाजारातील रस्ते काँक्रिटीकरणाच्या अंतिम बिलांशी संबंधित होते. विरोधकांच्या मते, ही कामे निकृष्ट दर्जाची असून निविदा प्रक्रिया शासनाच्या नियमावलीविरुद्ध पार पडली आहे. निवडणूक आचारसंहितेच्या आदल्या दिवशी निविदा प्रसिद्ध करून ती मंजूर करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
काम पूर्ण होण्याआधीच अंतिम देयक
याशिवाय, संबंधित कामांसाठी शासनाने घालून दिलेल्या अटी-शर्तींचे उल्लंघन करून अंतिम बिल अदा करण्यात आले. स्थानिक सक्षम अधिकाऱ्यांची परवानगी न घेता बांधकाम सुरू करण्यात आले असून, अद्याप काम पूर्ण होण्याआधीच अंतिम देयक अदा केल्याचा आरोप आहे. या सर्व अनियमितता लक्षात घेऊन विखे गटाने विरोध दर्शविला आहे.
बदनामी करण्याचा प्रयत्न करू नये – सभापती नवले
सभापती सुधीर नवले यांनी या आरोपांना उत्तर देत विरोधी गटावरच टीका केली आहे. “मागील बैठक कोरम अभावी तहकूब करण्यात आली होती, आणि कालच्या बैठकीत दोन महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होऊन निर्णय घेण्यात आले. यासाठी 14 संचालकांनी सह्या केल्या आहेत,” असे नवले यांनी स्पष्ट केले. विरोधी गटाच्या काही सदस्यांनी बैठक आटोपल्यानंतर उपस्थित राहून आक्षेप नोंदवण्याचा प्रयत्न केल्याचा दावा त्यांनी केला आहे. “संस्थेची बदनामी करण्याचा प्रयत्न करू नये. जर विरोध करायचा असेल, तर तो बैठक वेळेवर उपस्थित राहून करावा,” असेही नवले यांनी सांगितले.
बाजार समितीतील वातावरण तापले
या आरोप-प्रत्यारोपामुळे बाजार समितीतील वातावरण चांगलेच तापले आहे. एका बाजूला विरोधी गट सत्ताधाऱ्यांवर अनियमिततेचा आरोप करत आहे, तर दुसरीकडे सत्ताधारी गट विरोधकांच्या भूमिकेवर आक्षेप घेत आहे. आगामी काळात या वादाची दिशा काय असेल, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.