Sangamner News : संगमनेर तालुक्याचा विकास मोडण्यासाठी प्रशासकीय सोयीच्या नावाखाली तालुक्याची मोडतोड करण्याचा सत्ताधाऱ्यांचा कुटील डाव आहे. याला तालुक्यातून प्रखर विरोध होत असून 62 पैकी 42 गावांनी ग्रामसभा घेऊन हा अन्यायकारक प्रस्ताव तातडीने रद्द करावा या मागणीचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. तहसीलदार कार्यालय येथे विविध गावांमधील नागरिकांनी अखंड संगमनेर तालुका कृती समितीच्या वतीने आश्वी बुद्रुक प्रास्तावित कार्यालय रद्द करण्यात बाबतचे ठराव दिले.
यामध्ये म्हटले आहे की, लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुका हा विकासातून वैभवशाली ठरला आहे. मात्र काही लोकांना संगमनेर तालुक्याचा विकास पाहावत नसल्याने त्यांनी तालुक्याची मोडतोड सुरू केली आहे. सत्तेचा गैरवापर करून आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी आश्वी बुद्रुक येथे अप्पर तहसील कार्यालयाचा घाट घातला जात आहे.

संगमनेर तालुक्याच्या मोडतोडीचे वृत्त समजतात 171 गावे व 258 वाड्या वास्त्यांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला. याबाबत विविध निदर्शने व निवेदन देण्यात आली. गावोगावी ग्रामसभा घेण्यात आल्या हा तातडीने अन्यायकारक प्रस्ताव रद्द करावा ही मागणी सर्वत्र सुरू आहे.
आश्वी बुद्रुक हे सर्वांच्या दृष्टीने गैरसोयीची असून संगमनेर शहर हे प्रगतशील व सोयीचे आहे शाळा महाविद्यालय सर्व कार्यालय एकाच ठिकाणी असून दळणवळणाच्या सोयी आहेत. असे सर्व असताना हा नवीन प्रस्ताव का तयार झाला याचे उत्तर अद्याप सत्ताधाऱ्यांना देता आले नाही. यामुळे संगमनेर तालुक्यातील सर्व गावांनी अखंड संगमनेर तालुका कृती समिती स्थापन केली असून या माध्यमातून आंदोलन उभारले आहेत.
आश्वी बुद्रुक येथील प्रस्तावित अप्पर तहसील कार्यालयास चंदनापुरी, वाघापूर, रायते ,कोल्हेवाडी ,जाखुरी, पिंपळगाव माथा, कोकणगाव, शिवापूर, कोणची, मांची, माळेगाव हवेली ,निमज ,समनापुर ,सुकेवाडी, रहिमपूर, अंभोरे ,कोळवाडे, खराडी, निमगाव टेंभी ,संगमनेर खुर्द ,रायतेवाडी ,जोर्वे, खांजापूर ,सावरगाव तळ ,हिवरगाव पावसा, झोळे, कुरण, शिरापूर ,पोखरी हवेली, खांडगाव, निंबाळे, पिंपरणे,वडगाव पान या गावांनी ग्रामसभा घेऊन ठराव दिले आहेत. यावेळी कृती समितीचे अध्यक्ष भाऊसाहेब राहणे, उपाध्यक्ष अरुण गुंजाळ ,सचिव रामेश्वर पानसरे व सर्व गावांमधील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. हे निवेदन नायब तहसीलदार गिरी यांनी स्वीकारले. यावेळी संगमनेर बचाव च्या घोषणा देण्यात आल्या.
तालुक्याच्या घरभेद्यांचा तीव्र निषेध
संगमनेर तालुका अखंडित व एकसंघ रहावा याकरता सर्व गावे एकवटली आहेत. असे असताना सत्ताधाऱ्यांची मर्जी राखणारे काही घरभेदी एकत्र येऊन आश्वी बुद्रुक येथे तहसील कार्यालय करावे अशी मागणी करत आहेत. हे अत्यंत दुर्दैवी व कृतघ्न कृत्य असून हे लोक उघडे पडले आहेत. अशा तालुका विघातक प्रवृत्तींचा संगमनेर तालुक्यातील जाणकार नागरिकांनी निषेध केला आहे. एकसंघ संगमनेर तालुक्याच्या विरोधी भूमिका घेणाऱ्या अशा नागरिकांबद्दल सर्वत्र तीव्र नाराजी निर्माण झाली असून तरुणांमध्ये या व्यक्तींबद्दल मोठा रोष निर्माण झाला आहे.