भारतासह कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये स्ट्रोकमुळे मृत्यू आणि अपंगत्वाची समस्या गंभीर होत चालली आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) च्या २०२३ च्या लॅन्सेट जर्नलच्या अभ्यासानुसार, २०५० पर्यंत स्ट्रोकमुळे १ कोटी मृत्यू होऊ शकतात. भारतातील वैद्यकीय अहवालांनुसार, स्ट्रोक हे मृत्यूचे तिसरे प्रमुख कारण आणि अपंगत्वाचे सहावे प्रमुख कारण ठरले आहे.
स्ट्रोक हा मेंदूला ऑक्सिजन आणि आवश्यक पोषक तत्त्वांचा पुरवठा थांबल्यामुळे होतो. त्यामुळे मेंदूच्या पेशी मरतात आणि व्यक्तीला कायमस्वरूपी नुकसान होऊ शकते. काही प्रकरणांमध्ये मृत्यू, पक्षाघात, अस्पष्ट बोलणे, दृष्टीदोष, किंवा स्मरणशक्ती कमी होणे असे दुष्परिणाम दिसून येतात. गेल्या काही वर्षांत महिलांमध्ये स्ट्रोकचे प्रमाण वाढत असल्याचे न्यूरोसर्जन आणि तज्ज्ञांनी अधोरेखित केले आहे.

महिलांमध्ये स्ट्रोक होण्याची शक्यता जास्त का?
गर्भधारणेपासून ते रजोनिवृत्तीपर्यंत, महिलांच्या जीवनशैलीतील आणि शरीरातील बदल स्ट्रोकच्या धोक्यात वाढ करू शकतात. इस्ट्रोजेनच्या पातळीत होणारे बदल, हार्मोनल असंतुलन, जीवनशैलीतील दोष आणि अन्य वैद्यकीय परिस्थिती यामुळे महिलांमध्ये स्ट्रोकचा धोका अधिक असतो.
महिलांमध्ये स्ट्रोक होण्याची कारणे
१) हार्मोनल बदल आणि गर्भनिरोधक गोळ्यांचा प्रभाव
गर्भनिरोधक गोळ्यांचा नियमित वापर आणि त्यातील हार्मोन्समुळे रक्ताच्या गुठळ्या तयार होण्याची शक्यता वाढते. उच्च इस्ट्रोजेन पातळी रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या निर्माण करू शकते, ज्यामुळे महिलांमध्ये स्ट्रोकचा धोका वाढतो.
२) रजोनिवृत्तीनंतर स्ट्रोकचा धोका वाढतो
रजोनिवृत्तीमुळे शरीरातील इस्ट्रोजेन पातळी कमी होते. याचा परिणाम हृदयाच्या आरोग्यावर आणि रक्तवाहिन्यांवर होतो. यामुळे रक्तदाब वाढतो आणि हृदयाच्या कार्यक्षमतेत घट होते, ज्यामुळे स्ट्रोकचा धोका वाढतो.
३) गरोदरपणाशी संबंधित समस्या
गर्भधारणेदरम्यान अनेक हार्मोनल आणि शरीरातील जैविक बदल होतात. काही महिलांना प्रेग्नेंसीमधील उच्च रक्तदाब (प्री-एक्लेम्पसिया) किंवा गरोदरपणातील मधुमेह होण्याची शक्यता असते, हे दोन्ही घटक स्ट्रोकचा धोका वाढवतात. योग्य उपचार न घेतल्यास, यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या तयार होऊ शकतात आणि ब्रेन स्ट्रोक होण्याचा धोका निर्माण होतो.
४) अॅट्रियल फायब्रिलेशन (हृदयाचे अनियमित ठोके)
वृद्ध महिलांमध्ये हृदयाच्या अनियमित ठोक्यांची समस्या आढळते, जी अॅट्रियल फायब्रिलेशन म्हणून ओळखली जाते. यामुळे रक्तप्रवाह बिघडतो आणि रक्ताच्या गुठळ्या तयार होण्याची शक्यता वाढते, परिणामी ब्रेन स्ट्रोकचा धोका निर्माण होतो.
५) धूम्रपान आणि मद्यपान
धूम्रपान केल्याने रक्तवाहिन्या अरुंद होतात आणि रक्ताच्या गुठळ्या निर्माण होण्याचा धोका वाढतो. सतत धूम्रपान करणाऱ्या महिलांमध्ये स्ट्रोक होण्याचा धोका दोन ते तीन पट जास्त असतो. याशिवाय, अल्कोहोलचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने रक्तदाब वाढतो आणि हृदयाचे कार्य कमजोर होते, परिणामी स्ट्रोकची शक्यता वाढते.
६) लठ्ठपणा आणि व्यायामाचा अभाव
लठ्ठपणा हा स्ट्रोकसाठी सर्वात मोठा जोखीम घटक आहे. लठ्ठपणामुळे उच्च रक्तदाब, मधुमेह आणि कोलेस्ट्रॉल वाढतो, ज्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होतो आणि स्ट्रोकचा धोका वाढतो.
महिलांमध्ये स्ट्रोक टाळण्यासाठी उपाय
१) निरोगी जीवनशैली अवलंबणे
स्ट्रोक टाळण्यासाठी महिलांनी नियमित व्यायाम, संतुलित आहार आणि वजन व्यवस्थापन यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. नियमित व्यायाम केल्याने हृदय मजबूत राहते, रक्तप्रवाह सुधारतो आणि रक्तदाब नियंत्रणात राहतो.
२) आहारावर नियंत्रण ठेवणे
पौष्टिक आणि संतुलित आहार घेतल्यास रक्तातील कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवता येतो. ताज्या फळे, भाज्या, संपूर्ण धान्य, प्रथिनेयुक्त पदार्थ आणि ओमेगा-३ फॅटी अॅसिड यांचा आहारात समावेश करावा. मीठ आणि साखरेचे प्रमाण कमी करणे महत्त्वाचे आहे.
३) नियमित वैद्यकीय तपासणी करणे
रक्तदाब, रक्तातील साखर आणि कोलेस्ट्रॉल पातळी नियमितपणे तपासणे आवश्यक आहे. विशेषतः रजोनिवृत्तीनंतर आणि गरोदरपणाच्या काळात महिलांनी हृदयविकार व रक्तदाब यांची तपासणी करून घ्यावी.
४) धूम्रपान आणि मद्यपान टाळणे
धूम्रपान पूर्णपणे सोडल्यास रक्तवाहिन्यांच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो आणि रक्ताच्या गुठळ्या होण्याचा धोका कमी होतो. अल्कोहोलचे प्रमाणही मर्यादित करणे आवश्यक आहे.
५) तणावावर नियंत्रण ठेवणे
स्ट्रोक होण्याच्या जोखीमांमध्ये मानसिक तणाव हा एक मोठा घटक असतो.
तणावात राहिल्यास रक्तदाब वाढतो आणि रक्तवाहिन्यांवर विपरीत परिणाम होतो. तणाव कमी करण्यासाठी ध्यान, योग आणि सकारात्मक मानसिक आरोग्याचे पालन करणे गरजेचे आहे.
महिलांमध्ये स्ट्रोकच्या घटनांमध्ये वाढ होत असून, त्याला मुख्यतः हार्मोनल बदल, जीवनशैलीतील दोष, गर्भधारणेदरम्यान होणारे बदल आणि वाढत्या वयानुसार येणाऱ्या हृदयविकारांचा परिणाम कारणीभूत आहे. गर्भनिरोधक गोळ्या, धूम्रपान, मद्यपान, अनियमित हृदयाचे ठोके, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा आणि व्यायामाचा अभाव हे प्रमुख धोके आहेत. महिलांनी नियमित वैद्यकीय तपासणी, निरोगी आहार, तणाव नियंत्रण, आणि व्यायाम यावर लक्ष केंद्रित करून स्ट्रोकचा धोका कमी करू शकतात. योग्य आरोग्य व्यवस्थापन आणि प्रतिबंधात्मक उपाय केल्यास महिलांमध्ये स्ट्रोक होण्याचे प्रमाण कमी करता येईल.