अहिल्यानगर जिल्ह्याला लवकरच मिळणार आणखी एक आमदार !

Published on -

Ahilyanagar Report : लोकसभा व त्यानंतर विधानसभा निवडणूक झाली. गेली वर्षभर या दोन्ही निवडणुकांचीच महाराष्ट्रात चर्चा होती. कार्यकर्त्यांच्या अंगावरचा गुलाल निघतो न निघतो तोच, आता पुन्हा गुलाल उडविण्याची संधी कार्यकर्त्यांना मिळणार आहे. त्यातही अहिल्यानगर जिल्ह्यातील महायुतीचे कार्यकर्ते नव्या दमात गुलालाची तयारी करत असल्याच्या चर्चा आहेत.

विधान परिषदेच्या पाच जागांची पोटनिवडणूक येत्या २७ मार्चला होणार आहे. याच निवडणुकीत नगर जिल्ह्याला १३ वा आमदार मिळेल, असे बोलले जात आहे. हा १३ वा आमदार नेमका कोण? काय आहे विधान परिषदेची गणिते? याच विषयाचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट

महाराष्ट्रात सध्या पुन्हा एकदा निवडणुकीचा बिगूल वाजला आहे. आता या निवडणुकीत सामान्यांना मतदानाचा अधिकार नसला तरी, पाच नव्या आमदारांची भर मात्र पडणार आहे. विधान परिषद सदस्याची लोकसभा अथवा विधानसभेवर निवड झाल्यास त्याचे विधान परिषद सदस्यत्व आपोआपच रद्द होते. असा नियम आहे.

गेल्या विधानसभा निवडणुकीत प्रवीण दटके, रमेश कराड, गोपीचंद पडाळकर या भाजपच्या व राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या राजेश विटेकर तसेच शिवसेना शिंदे गटाच्या आमश्या पाडवी या विधान परिषदेच्या पाच आमदारांची विधानसभेवर निवड झाली.

पाचही जणांची विधान परिषदेची आमदारकी संपुष्टात आली. याच पाच जागांसाठी आता पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. १० ते १७ मार्च या काळात उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. तर यासाठी थेट २७ मार्चला मतदान होणार आहे.

विधान परिषदेच्या रिक्त असलेल्या पाच जागांपैकी तीन आमदार भाजपचे आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादीचा प्रत्येकी एक आमदार आहे. महायुतीत ज्याची जागा त्याला लढण्याची संधी द्यायची, असा निर्णय आधी झाला होता. यानुसार भाजपचे तीन आणि शिवसेना व राष्ट्रवादीचा प्रत्येकी एक उमेदवार निवडून येऊ शकतात.

विधानसभेत महायुतीचे २३७ आमदार असल्याने प्रत्यक्ष निवडणूक झाली तरीही महायुतीला पाचही जागा निवडून आणण्यासाठी काहीही अडचण येणार नाही. पाचपैकी तीन जागा या पुढील वर्षी मे महिन्यात रिक्त होणार आहेत. उर्वरित दोनपैकी एक जागा २०३० पर्यंत आहे तर दुसरी जागा २०२८ पर्यंत आहे.

म्हणजेच आत्ता ज्यांना संधी भेटेल त्यापैकी तिघांना फक्त वर्षभरापुरतीच आमदारकी मिळेल. त्यानंतर मात्र पुन्हा त्यांनाच आमदार होण्याचीही संधी असेल, म्हणजेच यातील तीन जण तब्बल सात वर्षेही आमदार राहू शकतात, असे गणित मांडले जात आहे.

आता ही झाली एक बातमी. पण पुढची बातमी याहून इंटरेस्टींग आहे. या पाच जागांसाठी सध्या लाँबिंग सुरु झाली आहे. भाजपच्या जागा या दिल्लीतून फायनल होऊन येणार असल्याचे सांगितले जात आहे.

परंतु शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादीचा अजित पवार गटासाठी मात्र रोज मुंबईत लाँबिंग सुरु असल्याचे सांगितले जात आहे. आता भाजपला ज्या तीन जागा मिळाल्या आहेत. त्यासाठी कुणाची नावे चर्चेत आहेत, ते आपण पाहू…

१. राम सातपुते
२. जगदीश मुळीक
३. संदीप जोशी
४. संजय केणीकर
५. प्रमोद जठार
६. केशव उपाध्ये

ही सहा नावे सध्या नागपूर व मुंबईत चर्चेत आली आहेत. आता गंमत म्हणजे अहिल्यानगर जिल्ह्यातील तीन नावेही अचानक त्यांचे कार्यकर्ते घेऊ लागले आहेत. त्यापैकी सगळ्यात महत्त्वाचे नाव आहे, कोपरगावचे युवा नेते विवेक कोल्हे यांचे.

गेल्या विधानसभा निवडणुकीला अहिल्यानगर जिल्ह्यातच काय, पण अख्ख्या महाराष्ट्रात ज्या बंडखोरीची सर्वात जास्त चर्चा होऊ लागली होती, ती बंडखोरी होती कोपरगावची… महायुतीच्या जागावाटपात ही जागा स्टॅन्डिंग आमदार असल्याने अजित पवार गटाच्या आशुतोष काळेंना जाणार होती. परंतु तीन पिढ्यांचा सहकाराचा वारसा असलेल्या विवेक कोल्हे नक्की बंडखोरी करणार, अशी त्यांची बाँडी लँग्वेज सांगत होती.

कारण त्यापूर्वी त्यांनी पदवीधर मतदारसंघातूनही निवडणूक लढवली होती. विशेष म्हणजे अपक्ष लढूनही त्यांनी दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवली होती. आता याच विवेक कोल्हेंना शांत करण्यासाठी, देवेंद्र फडणवीसांना कोल्हे कुटुंबाला थेट दिल्लीपर्यंत न्यावे लागले. तेथे अमित शहांसमोर समेट करावा लागला.

आता या समेटमध्ये, अमित शहांनी केंद्र व राज्य यापैकी कोठेतरी पुनर्वसन करण्याचा शब्द अमित कोल्हेंना दिल्याचे बोलले गेले. त्यामुळे आता अचानक विधान परिषद निवडणुकीत त्यांना उमेदवारी संधी मिळेल, असे सांगितले जात आहे. गेल्या दोन दिवसांतील मुंबईतल्या हालचाली पाहता, कोल्हेंच्या नावाचा सुखद धक्का अहिल्यानगरकरांना मिळू शकतो, असे दिसते.

विवेक कोल्हेंसह अजून दोन नावांची चर्चा त्या-त्या कार्यकर्त्यांकडून सुरु आहे. भाजप धक्का देण्यात माहिर असल्याने ही दोन नावेही अचानक चर्चेत आली आहेत. परंतु त्यांना संधी मिळेल असे वाटत नाही. आता ही दोन नावे कोणती तर एक श्रीरामपूरचे हिंदूत्ववादी नेते सागर बेग व दुसरे मराठा समाजाचे नेवाशाचे नेते संभाजीराव दहातोंडे….

आता ही नावे त्यांच्या कार्यकर्त्यांकडून का चर्चेत आहेत, तेही पाहू…
संभाजीराव दहातोंडे हे देवेंद्र फडणवीसांच्या अगदी जवळचे नेते मानले जातात. गेल्या १०-१५ वर्षांपासून संभाजी दहातोंडे यांना अनेकदा फडणवीसांसोबत पाहिले गेले आहे. आत्तापर्यंत भाजपने राज्य पातळीवरच्या अनेक जबाबदाऱ्या दहातोंडे यांना दिल्या.

त्या त्यांनी पूर्णही केल्या. त्यामुळे फडणवीसांच्या फेवरमधील नेते म्हणून त्यांचे नाव चर्चेत आले आहे. दुसरीकडे गेल्या विधानसभा निवडणुकीत सागर बेग यांनी अपक्ष निवडणूक लढवत सुमारे ५० हजार मते मिळवली. हेमंत ओगले, भाऊसाहेब कांबळे, लहू कानडे असे दिग्गज रिंगणात असतानाही, सागर बेग यांनी हिंदूत्वाच्या जोरावर 3 ऱ्या क्रमांकाची मते मिळवली.

गेल्या आठवड्यात मढीतील सभेतही मंत्री नितेश राणे यांनी अनेकदा सागर बेग यांचा उल्लेख केला. म्हणजेच भाजपच्या गुड बुकमध्ये सागर बेग यांची एन्ट्री झालीय, हे नक्की झाले. त्यामुळे त्यांचे कार्यकर्तेही विधान परिषदेला त्यांचे नाव घेऊ लागले आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe