Maharashtra New Expressway : भारतात गेल्या काही वर्षांमध्ये हजारो किलोमीटर लांबीचे नवनवीन महामार्ग तयार झाले आहेत. रस्त्यांचे नेटवर्क वाढवण्यासाठी गेल्या काही वर्षांमध्ये शासन आणि प्रशासनाने युद्ध पातळीवर प्रयत्न केले आहेत आणि यामुळे भारतातील दळणवळण व्यवस्था ही गेल्या काही वर्षांच्या तुलनेत सध्या मजबूत दिसते.
आपल्या महाराष्ट्रात देखील गेल्या काही वर्षांमध्ये रस्ते विकासाचे अनेक प्रोजेक्ट पूर्ण झाले आहेत आणि यामुळे देशातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, आपल्या राज्याला आणखी एका नव्या महामार्गाची भेट मिळणार आहे.

हा नवीन महामार्ग मध्य प्रदेश, महाराष्ट्र अन तेलंगणा या राज्यांना जोडणार आहे. यामुळे राज्या-राज्यांमधील कनेक्टिव्हिटी आणखी वाढणार आहे. इंदूरला हैदराबादशी जोडण्यासाठी हा प्रोजेक्ट भारतमला प्रकल्पांतर्गत विकसित केला जाईल. हा प्रोजेक्ट 713 किमी लांबीचा राहणार आहे.
हा महामार्ग इंदूर ते बाडवा-बुरहानपूरमार्गे इच्छापूर मार्गे महाराष्ट्र आणि तेलंगणा मधून हैदराबाद असा राहणार आहे. दरम्यान, आता आपण हा महामार्ग प्रकल्प नेमका कसा राहणार ? राज्यातील कोणते भाग एकमेकांना जोडले जाणार ? याच बाबतची संपूर्ण माहिती पाहणार आहोत.
कसा असणार 713 किलोमीटर लांबीचा महामार्ग प्रकल्प?
केंद्र शासनाच्या माध्यमातून भारतमाला परियोजना अंतर्गत इंदोर ते हैदराबाद दरम्यान 713 कि.मी. लांबीचा महामार्ग प्रकल्प तयार होत असून या प्रस्तावित महामार्गाला बर्याच ठिकाणी राज्य महामार्ग देखील जोडले जाणार आहेत.
जे राष्ट्रीय महामार्गाप्रमाणेचं एनएचएआयकडून बांधले जाणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार हा नव्याने प्रस्तावित करण्यात आलेला हा संपूर्ण महामार्ग 15 हजार कोटीचा राहणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, सध्या इंदोर ते हैदराबादचे अंतर 876 किमी इतकं आहे.
पण एकदा हा महामार्ग तयार झाला की, हा मार्ग 157 किमीने कमी होणार आहे. यामुळे प्रवासाचा कालावधी 3 तासांनी कमी होणार आहे. ह्या प्रकल्पामुळे इंदूर ते हैदराबाद हे अंतर केवळ 10 तासात पोहोचता येणार आहे.
हा महामार्ग इंदौर, बुरहानपुर आणि बाडवा मार्गे मुक्ताईनगर, जळगाव, अकोला, हिंगोली आणि नांदेडमधून जाणार अन पुढे तेलंगानामधील मंगलूर, रामसनपल्ली, संगारेड्डी असा हैदराबादपर्यंत जाणार आहे. इंदूर आणि हैदराबाद दरम्यानच्या महामार्गाच्या बांधकामामुळे आयटी कंपन्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होईल.
लॉजिस्टिक्स सुधारण्यास मदत होणार आहे. या नव्या प्रस्तावित प्रकल्पामुळे इंदूरमधील व्यापारी त्यांच्या वस्तू सहजपणे दक्षिण भारतात पोहोचवू शकतील. हा महामार्ग प्रकल्प कृषी, पर्यटन, शिक्षण, अध्यात्म आणि औद्योगिक क्षेत्रासाठी मोठा फायद्याचा ठरणार आहे.