शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारच्या अर्थसंकल्पावर जोरदार टीका केली आहे. त्यांनी या अर्थसंकल्पाला “मागील दहा हजार वर्षांतील सर्वात बोगस” असल्याचे संबोधले. यावेळी त्यांनी ज्येष्ठ लेखक आणि व्यंगचित्रकार आचार्य अत्रे यांची आठवण काढत, “आज ते असते, तर त्यांनीही असा बोगस अर्थसंकल्प पाहिला नसल्याचे म्हटले असते”, असे विधान केले.
उद्धव ठाकरे यांनी सरकारच्या निवडणुकीपूर्वीच्या जाहिरातींवरही निशाणा साधला. “मारल्या होत्या थापा भारी आणि महाराष्ट्र केलाय कर्जबाजारी” असे म्हणत, सरकारने जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत, असा आरोप केला. विधानसभा निवडणुकीदरम्यान महायुती सरकारने विविध आश्वासने दिली होती, मात्र ती प्रत्यक्षात उतरली नाहीत.

महायुती सरकारने महिलांसाठी २१०० रुपये देण्याचे आश्वासन दिले होते, मात्र या अर्थसंकल्पात त्याचा कोणताही उल्लेख नाही. शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या कर्जमाफीबाबतही काही ठोस घोषणा करण्यात आलेली नाही, हे स्पष्ट करत ठाकरे यांनी सरकारच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर करताना उद्धव ठाकरे यांचे नाव घेत, “मी काही उद्धव ठाकरे नाही, जो स्थगिती देईल” असे वक्तव्य केले होते. यावर प्रत्युत्तर देताना ठाकरे म्हणाले, “तुम्हाला उद्धव ठाकरे होता येणार नाही. कारण उद्धव ठाकरे होण्यासाठी दिलेली आश्वासने पूर्ण करावी लागतात.”
शिवसेना ठाकरे गटाने त्यांच्या सरकारच्या कार्यकाळात शेतकऱ्यांसाठी ठोस योजना राबवल्या होत्या, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारने देखील शेतकऱ्यांसाठी कर्जमुक्तीचा कालबद्ध कार्यक्रम आणावा, अशी मागणी केली. नागपूर येथे त्यांच्या सरकारने जाहीर केलेल्या कर्जमुक्ती योजनेचा दाखला देत, शेतकऱ्यांच्या हितासाठी महायुती सरकारने देखील ठोस पावले उचलावीत, असे आवाहन त्यांनी केले.
उद्धव ठाकरे यांनी या संपूर्ण अर्थसंकल्पाला एक प्रकारची दिशाभूल करणारी जाहिरात असल्याचे सांगत, यात महाराष्ट्राच्या विकासासाठी कोणताही ठोस दृष्टिकोन नाही, असा आरोप केला. त्यांनी सरकारच्या कामगिरीबाबत गंभीर चिंता व्यक्त करत, “सरकार फक्त घोषणाबाजी करत आहे, पण प्रत्यक्षात विकासाच्या बाबतीत काहीच करत नाही”, असे वक्तव्य केले.