१४ मार्च २०२५ अहिल्यानगर : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमार्फत सध्याच्या घडीला ३ हजार ५३७ कामे चालू आहेत.या कामांवर २६ हजार ६०७ मजूर काम करत असून जिल्ह्यात मनरेगा मार्फत ७ लाख ५९ हजार २६२ मजुरांनी नोंदणी केलेली आहे.यामध्ये मनरेगाच्या कामांमध्ये डीएड,बीएड शिक्षित बेरोजगार तरुण काम करत आहे.
बेरोजगारी घालवण्यासाठी केंद्र सरकारने मागेल त्याला शंभर दिवस काम देण्याची हमी देणारी रोजगार हमी योजना सुरु केली आहे.या योजनेमार्फत वेगवेगळे लोकाभिमुख निर्णय घेतले जात आहेत पण, कागदपत्रांवर मजुरांची जास्त संख्या दाखवून यंत्राच्या मदतीनेच बऱ्याच ठिकाणी कामे करून घेतल्याचे दिसत आहे. म्हणून रोजगार हमी योजनेचा मजुरांच्या हाताला काम देण्याचा हेतू पूर्ण होताना दिसत नाही.

अहिल्यानगरमध्ये साडेसात लाख जॉबकार्ड
जिल्ह्यात ७ लाख ५९ हजार २६२ मजुरांनी जॉबकार्ड काढली असून त्यापैकी फक्त २ लाख २५ हजार १९४ मजूरांचे जॉबकार्ड चालू आहेत.सध्याच्या घडीला २६ हजार ६०७ मजूर रोजगार हमीच्या कामावर रुजू आहेत.यातील बरेच मजूर कामाची वाट बघत आहेत,तर काही मजुरांनी जॉबकार्ड काढले नाही कारण त्यांना कामाची गरज नसल्याची माहिती समजली आहे.
३१ प्रकारची कामे
जिल्ह्यातील ग्रामपंचायती मार्फत ३ हजार ५३७ कामे सध्या चालू आहेत.३१ प्रकारची कामे रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून केली जातात.त्यापैकी घरकुल, नाला सरळीकरण, खडीकरण याच कामावर मजूर हजर असलेले दिसतात.