कर्जत येथे महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमात आमदार रोहित पवार यांनी सभापती प्रा. राम शिंदे यांच्यावर राजशिष्टाचार शिकण्याची गरज असल्याचे वक्तव्य केले होते.
यावर भाजप जिल्हा सरचिटणीस सचिन पोटरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत आमदार पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. देशाच्या सर्वोच्च लोकशाही व्यवस्था मान्य नसलेल्या लोकांनी सभापतींना शिष्टाचार शिकवण्याची गरज नसल्याचे प्रत्युत्तर त्यांनी दिले.

सचिन पोटरे यांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा दाखला देत सांगितले की, विधानसभा अध्यक्ष किंवा विधीमंडळातील पिठासीन अधिकारी राजकीय प्रचार करू शकतात. त्यांच्या भूमिकांवर कोणतेही कायदेशीर बंधन नाही.
सभागृहाच्या कारभारात तटस्थता पाळणे अपेक्षित असले तरी, सभागृहाबाहेर राजकीय प्रचार करणे, प्रसारमाध्यमांशी संवाद साधणे आणि राजकीय मतप्रदर्शन करणे हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे. त्यामुळे सभापतींनी काय बोलावे, हे अल्प मतांनी निवडून आलेल्या लोकांनी शिकवू नये, असे पोटरे यांनी स्पष्ट केले.
पोटरे यांनी महाविकास आघाडी सरकारवरही निशाणा साधला. त्यांच्या कार्यकाळात लोकशाही पायदळी तुडवली गेल्याचा आरोप त्यांनी केला. सभापती प्रा. राम शिंदे यांचे राजकीय व्यक्तिमत्त्व सुसंस्कृत असून,
ते आपल्या पदाची आणि मतदारसंघाची प्रतिष्ठा राखतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यासाठी कोणाच्या प्रमाणपत्राची आवश्यकता नसल्याचेही त्यांनी ठणकावले.
या वादाच्या पार्श्वभूमीवर कर्जत भाजपानेही आक्रमक भूमिका घेतली आहे. पोटरे यांच्या या प्रतिक्रियेला तालुकाध्यक्ष शेखर खरमरे आणि भाजप कार्यकर्ते पप्पू धोदाड यांनी पाठिंबा दर्शवला. या वक्तव्यामुळे कर्जतच्या राजकीय वातावरणात नव्या चर्चांना उधाण आले आहे.