पुणे- पुण्यातील शाळा आणि महाविद्यालयांच्या वार्षिक परीक्षा संपल्यानंतर उन्हाळी सुट्यांची सुरुवात होताच पुणेकर पर्यटनासाठी विविध ठिकाणी गर्दी करत आहेत. विशेषतः थंड हवेच्या ठिकाणे, समुद्रकिनारे, आणि निसर्गरम्य स्थळे यांना पसंती दिली जात आहे. त्यामुळे एसटी, रेल्वे आणि विमानसेवा पूर्ण क्षमतेने भरलेल्या आहेत.
परदेशात वाढले आकर्षण
पुणेकर आता केवळ देशांतर्गतच नाही तर परदेशातील विविध ठिकाणीही मोठ्या प्रमाणात प्रवास करत आहेत. पुणे विमानतळावरून दुबई, बँकॉक आणि सिंगापूर या ठिकाणी थेट आंतरराष्ट्रीय उड्डाणे होत असून या गंतव्यस्थळांना चांगली मागणी आहे. त्याचप्रमाणे साऊथ अमेरिका, युरोप, स्वित्झर्लंड, इटली, अंटार्टिका, ऑस्ट्रेलिया, केनिया, टांझानिया, बाकू, आणि जॉर्जिया या ठिकाणीही पुणेकर पर्यटनासाठी जात आहेत. कमी बजेट असणारे पर्यटक फुकेत, भूतान, श्रीलंका, आणि थायलंडसारख्या पर्यायांना अधिक पसंती देत आहेत.

देशांतर्गत प्रवासाला पसंती
पुणे विमानतळावरून दररोज 208 विमानांचे उड्डाण आणि आगमन होत असून 30 हजारांहून अधिक प्रवासी दररोज प्रवास करत आहेत. जयपूर, लखनऊ, वाराणसी, कोलकाता, गोवा, दिल्ली, जम्मू-काश्मीर, लेह-लडाख अशा विविध ठिकाणी देशांतर्गत प्रवास वाढला आहे.
एमटीडीसी रिसॉर्ट्सची मागणी
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या रिसॉर्ट्सला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. भीमाशंकर, सिंहगड, कार्ला, पानशेत यासह वेलणेश्वर, ताडोबा, भंडारदरा, माळशेज घाट, तारकर्ली, अजिंठा अशा अनेक ठिकाणी एमटीडीसी रिसॉर्ट्स फुल्ल झाले आहेत.
पुण्यातील पर्यटनस्थळांवरही गर्दी
शहरातील शनिवारवाडा, लाल महाल, सारसबाग, दगडूशेठ गणपती, खडकवासला, सिंहगड, मुळशी, पानशेत, थेऊर, लवासा, हाडशी आदी ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची गर्दी दिसून येते. या स्थळांवर शहरी आणि ग्रामीण भागातील पर्यटक मोठ्या संख्येने भेट देत आहेत.
विमान कंपन्यांची दरवाढ
उन्हाळी सिझनमध्ये विमान कंपन्यांच्या तिकिटांचे दर गगनाला भिडतात. त्यामुळे सर्वसामान्य पर्यटकांना मोठा आर्थिक बोजा सहन करावा लागतो. ट्रॅव्हल एजंट असोसिएशनच्या म्हणण्यानुसार, या दरवाढीवर सरकारने अंकुश आणण्याची गरज आहे.
पर्यटन उद्योगाला चालना
रिसॉर्ट्स व ट्रॅव्हल एजंट्सच्या म्हणण्यानुसार, यंदाच्या उन्हाळ्यात पर्यटन क्षेत्राला मोठा बूस्ट मिळाला आहे. पर्यटकांचा ओघ पाहता येत्या आठवड्यांत ही मागणी आणखी वाढेल, असा विश्वास एमटीडीसीने व्यक्त केला आहे.
पुणेकरांचे थंड हवेच्या ठिकाणी पर्यटनासाठी वाढते आकर्षण पाहता, उन्हाळी सुट्ट्या म्हणजे पर्यटन उद्योगासाठी सुवर्णसंधी ठरते आहे. देश-विदेशातील पर्यटन स्थळांवरील गर्दी हेच याचे द्योतक आहे. सरकारने विमान दर नियंत्रणात ठेवले तर पर्यटन अधिक सर्वसमावेशक होऊ शकते.