अहिल्यानगर : पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जलसंधारणाच्या कामांना पर्याय नाही.या दृष्टीनेच जलयुक्त आणि गाळमुक्त-तलाव गाळयुक्त शिवार या महत्त्वाकांक्षी योजनांची अंमलबजावणी होत आहे.जलयुक्त टप्पा दोनची कामे पूर्णत्वाला जात असताना जिल्ह्यातील गाळमुक्त तलाव योजनेतील कामे देखील निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी निर्देश दिले आहेत.जिल्हा पाणीदार होण्यासाठी जलसंधारणाच्या कामी लोकसहभागाचे एकजुटीचे पाठबळ मिळावे,असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी केले आहे.
राज्य शासनाच्या वतीने पाणीटंचाईवर मात करण्याच्या दृष्टिकोनातून जलयुक्त टप्पा दोन आणि गाळमुक्त तलाव गाळयुक्त शिवार या योजना हाती घेण्यात आले आहेत.जलयुक्त टप्पा दोन मध्ये जिल्ह्यातील ३६८ गावांचा समावेश असून जलयुक्त टप्पा दोनची जवळपास ८५ टक्के कामे पूर्णत्वास गेली आहेत.

यासोबतच गाळमुक्त तलाव-गाळयुक्त शिवार योजनेअंतर्गत जिल्ह्यातील जवळपास ४२१ कामे निश्चित करण्यात आली आहेत.यासाठी राज्य शासनाकडून २१ कोटी रुपयांचा निधी देखील मंजूर करण्यात आला आहे.वर्षानुवर्ष पावसाळ्यात पुराबरोबर येणारा गाळ साचल्याने तलाव,बंधारे यांची पाणी साठवण क्षमता घटली आहे.
तलावातील हा गाळ काढल्यास बंधारे तलावांतील पाणीसाठा वाढणार असून शेती सिंचना बरोबरच पिण्याच्या पाण्यासाठी देखील त्याचा उपयोग होणार आहे.तसेच तलावातील काढलेला गाळ शेत जमिनीत टाकल्याने जमिनीची सुपीकता वाढणार असून पिकाच्या सरासरी एकरी उत्पन्नात वाढ होणार आहे.
भूगर्भातील जलस्तर वाढवणाऱ्या आणि शिवार जलयुक्त होण्यासाठी या दोन्ही योजना उपयोगी ठरणार आहेत. या दोन्हीही योजनांचा आढावा जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया नियमित घेत आहेत.अहिल्यानगर जिल्ह्यातील जलसंधारणाची कामे चळवळ स्वरूपात व्हावी यासाठी जिल्हाधिकारी डॉ.आशिया प्रयत्नशील आहेत.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या ३०० व्या जयंती वर्षानिमित्त जिल्ह्यातील किमान तीनशे तलाव बंधारे गाळमुक्त करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी डॉ.आशिया म्हणाले,पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जलसंधारण आणि मृदा संधारणाच्या कामांना पर्याय नाही.जलयुक्त शिवार ही महत्त्वाकांक्षी योजना त्यासाठीच प्रेरित आहे.
यासोबतच गाळमुक्त तलाव-गाळयुक्त शिवार या योजनेची देखील जिल्ह्यात अंमलबजावणी होत आहे. जलसंधारणाच्या या प्रयत्नांना लोकसहभागाचे,स्वयंसेवी संस्थांचे पाठबळ मिळाले तर शिवार पाणीदार आणि जलसंपन्न होण्याचे स्वप्न नक्कीच साकार होणार आहे.जिल्ह्यातील नागरिक,स्थानिक गावकरी व शेतकऱ्यांनी जलसंधारणाच्या या कामात सक्रिय सहयोग द्यावा, असे ते म्हणाले.