सरकार छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल संवेदनशील ; माजी मंत्री तनपुरे यांचे आत्मक्लेश आंदोलन

Published on -

राहुरी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना होऊन २० दिवसांचा कालावधी उलटून गेला, तरी अद्याप आरोपींचा तपास लावण्यात पोलिसांना यश आलेले नाही. राहुरी पोलिसांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तत्काळ आणि सखोल तपास करणे अपेक्षित होते.

पुतळ्याची विटंबना करणाऱ्या आरोपींना त्वरित अटक करावी, या मागणीसाठी चार दिवसांपूर्वी पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आले होते. काल सोमवारी प्राजक्त तनपुरे यांनी शनी चौक येथे आमरण उपोषण सुरू केले. त्या वेळी बोलताना त्यांनी सांगितले की, ”राहुरीत एवढी मोठी घटना घडूनही नागरिकांनी संयम राखत पोलिसांवर जबाबदारी सोपवली, पण या प्रकरणात काहीच प्रगती झालेली नाही.

रास्ता रोको किंवा बंद करून सर्वसामान्यांना त्रास देण्यापेक्षा आम्ही आता आत्मक्लेश आंदोलन करत आहोत. सध्याची परिस्थिती पाहता तपासात कोणतीही गती दिसून येत नाही. राज्य शासन छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने राज्यकारभार करण्याची ग्वाही देत असताना, दुसरीकडे त्यांच्या संदर्भातील विटंबनाच्या घटनांकडे दुर्लक्ष होत आहे, ही अत्यंत खेदजनक बाब आहे.

शासनाने या विषयाकडे दुर्लक्ष केल्यामुळे शिवप्रेमींना आमरण उपोषणासारखे आंदोलन हाती घ्यावे लागत आहे,” असे तनपुरे यांनी स्पष्ट केले. या उपोषणाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे, रिपब्लिकन पक्ष, प्रहार संघटना, तुळजाभवानी सेवा ट्रस्ट,

निळं वादळ युवा प्रतिष्ठान, सत्यशोधक लहुजी क्रांती सेना, अखिल भारतीय क्रांती सेना यांच्यासह विविध संघटना, सेवा संस्था, ग्रामपंचायती तसेच सेवा संस्थांचे पदाधिकारी यांनी पाठिंबा दिला आहे. आजच्या पहिल्याच दिवशी मोठ्या संख्येने शिवप्रेमींनी उपोषणात सहभाग नोंदवला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News