राहुरी- शनि चौक परिसरात महापुरुषांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याच्या घटनेला २० दिवस उलटूनही पोलिसांना आरोपी सापडलेले नाहीत. यामुळे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत पोलिस प्रशासनाला दोन दिवसांत आरोपींना अटक करण्याचा इशारा दिला आहे.
या प्रकरणी त्यांनी उपोषण सुरू केले असून, स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने पाठिंबा दर्शवला आहे. सत्ताधारी लोकप्रतिनिधींच्या निष्क्रियतेवरही त्यांनी टीका केली आहे.

२० दिवसांपूर्वी घडली होती घटना
राहुरी नगरपरिषदेच्या हद्दीतील बुवासिंद बाबा तालीम परिसरात २० दिवसांपूर्वी दुपारच्या वेळी महापुरुषांच्या पुतळ्याला काळे फासून विटंबना करण्यात आली. इतक्या गंभीर घटनेनंतरही पोलिस प्रशासनाला आरोपींचा शोध लागलेला नाही, ज्यामुळे गृहखात्याच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. प्राजक्त तनपुरे यांनी पोलिसांच्या या नाकर्तेपणावर टीका करत दोन दिवसांत आरोपींची नावे जाहीर करण्याची मागणी केली आहे.
सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र
तनपुरे यांनी सत्ताधारी लोकप्रतिनिधींवरही निशाणा साधला आहे. त्यांच्या मते, छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदुत्वाच्या नावावर मते मिळवणारे सत्ताधारी या घटनेकडे दुर्लक्ष करत आहेत. “घटनेनंतर काही लोकप्रतिनिधींनी केवळ सोशल मीडियावर दिखाऊपणा केला, पण प्रत्यक्षात मुख्यमंत्र्यांकडे कारवाईची मागणी केली नाही,” असे तनपुरे म्हणाले. त्यांनी सत्ताधाऱ्यांचा हा राजकीय स्वार्थ असह्य असल्याचे सांगितले. “शिवप्रेमी हा अपमान सहन करणार नाहीत,” असे त्यांनी ठणकावले.
उपोषणाला पाठिंबा
प्राजक्त तनपुरे यांच्या उपोषणाला स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त पाठिंबा दिला. माजी खासदार प्रसाद तनपुरे, शिवसेना जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रविंद्र मोरे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाबासाहेब भिटे, रावसाहेब तनपुरे, प्रकाश देठे, काँग्रेस तालुका अध्यक्ष बाळासाहेब आढाव, व्यापारी संघटनेचे प्रल्हाद पारख, शिवाजी डौले, अनिल कासार, विजय तमनर, ज्ञानेश्वर बाचकर, सागर तनपुरे, सुनिल पवार, गजानन सातभाई, नंदू तनपुरे, प्रभाकर गाडे, सचिन भिंगारदे, बाळासाहेब खुळे, संदीप राऊत, संकेत दुधाडे, सौरभ उंडे, संतोष आपाय, अशोक कदम, प्रवीण लोखंडे, महेश चुत्तर यांच्यासह अनेकांनी उपोषणस्थळी उपस्थिती लावली.
आंदोलनाचा इशारा
“महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांना पाठीशी घालणे लज्जास्पद आहे. दोन दिवसांत आरोपींवर कारवाई न झाल्यास शिवप्रेमींचा संताप उफाळून तीव्र आंदोलन होईल,” असा इशारा तनपुरे यांनी दिला आहे. त्यांनी पोलिस प्रशासन आणि सत्ताधारी पक्षाला या प्रकरणी तात्काळ कठोर कारवाई करण्याचे आवाहन केले आहे. या घटनेमुळे राहुरीत तणावाचे वातावरण आहे, आणि नागरिकांमध्ये असंतोष वाढत आहे.