शेवगाव- येथील जनशक्ती मिलच्या संचालकांना चेन्नईस्थित एका वित्तीय कंपनीने ३० कोटींचे कर्ज मंजूर केल्याचे सांगून ६५ लाख रुपये आगाऊ व्याजाच्या नावाखाली उकळले आणि फसवणूक केली. या प्रकरणात शेवगाव पोलिसांनी सहा जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
केजी इन्व्हेस्टमेंट उर्फ कोना ग्रोथ इन्व्हेस्टमेंट असे या फायनान्स कंपनीचे नाव असून, जनशक्ती मिलचे व्यवस्थापकीय संचालक अॅड. शिवाजीराव काकडे यांच्या तक्रारीवरून ही कारवाई झाली.

नेमके काय आहे प्रकरण?
जनशक्ती मिलचे तत्कालीन मुख्य वित्त अधिकारी प्रशांत प्रभाकर कुलकर्णी (रा. सदाशिव पेठ, पुणे) यांना मुकुंद वसंत देशपांडे (रा. सहवास अपार्टमेंट, बाणेर, पुणे) यांनी चेन्नईतील केजी इन्व्हेस्टमेंट उर्फ कोना ग्रोथ इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेड (अण्णा नगर, चेन्नई) या कंपनीद्वारे त्वरित कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवले.
देशपांडे यांनी कंपनीच्या संचालकांशी संपर्क साधून कृष्णा अय्यप्पन आणि कामराज बलराज यांच्याशी दूरध्वनीद्वारे संवाद साधला. त्यानंतर ३१ डिसेंबर २०२१ आणि १ जानेवारी २०२२ रोजी रमेश एम. यांनी जनशक्ती मिलच्या साइटला भेट दिली. या भेटीनंतर ५ जानेवारी २०२२ रोजी कंपनीने ३० कोटींचे कर्ज मंजूर केल्याचे सांगितले.
६५ लाखांची आगाऊ रक्कम
कर्ज मंजुरीच्या प्रक्रियेसाठी कंपनीने जनशक्ती मिलच्या संचालकांना चेन्नईला बोलावले. शिवाजीराव काकडे, लक्ष्मण बिटाळ, मंदाकिनी पुरनाळे यांचे प्रत्येकी १० कोरे चेक, स्टॅम्प पेपर आणि इतर कागदपत्रे मागितली. १३ जानेवारी २०२२ रोजी काकडे, प्रशांत कुलकर्णी, भागधारक पोपट रावसाहेब खताळ आणि पृथ्वीसिंह विद्याधर काकडे चेन्नईतील कंपनीच्या कार्यालयात पोहोचले. तिथे मुकुंद देशपांडे आधीच हजर होते. संचालकांनी सर्व कागदपत्रे जमा केली आणि आगाऊ व्याजाच्या नावाखाली ६५ लाख रुपये कंपनीच्या खात्यात जमा करण्यास सांगितले. काकडे यांनी ही रक्कम जमा केली, परंतु त्यानंतर कर्जाची रक्कम मिळाली नाही.
फसवणुकीचा पर्दाफाश
कर्जाची रक्कम जमा न झाल्याने संचालकांनी कंपनीशी वारंवार संपर्क साधला. कंपनीने पोंगल सणाच्या सुट्ट्या आणि बँक बंद असल्याचे कारण पुढे केले. १७ मार्च २०२२ रोजी कंपनीने ५२ लाख रुपये किमतीचे सहा एचडीएफसी बँकेचे चेक पाठवले, परंतु त्यापैकी दोन चेक बँकेत जमा केले असता खात्यात पैसे नसल्याने ते वटले नाहीत.
उर्वरित चेकही बँकेत जमा करण्यात आले नाहीत. संचालकांनी जमा केलेली ६५ लाखांची रक्कम, चेक आणि कागदपत्रे परत मागितली, परंतु मुकुंद देशपांडे यांनी टाळाटाळ करत “असा कोणताही व्यवहार झालाच नाही” असे सांगितले. यामुळे फसवणुकीचा प्रकार उघड झाला.
गुन्हा दाखल
या फसवणुकीच्या तक्रारीवरून शेवगाव पोलिसांनी कृष्णा अय्यप्पन, कामराज बलराज, मुकुंद वसंत देशपांडे, प्रशांत प्रभाकर कुलकर्णी, रमेश एम. आणि अनिता उर्फ देविका यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, फायनान्स कंपनीच्या व्यवहारांची आणि आरोपींच्या पार्श्वभूमीची चौकशी सुरू आहे. “या प्रकरणात नागरिकांनी कर्जाच्या आमिषांना बळी पडण्यापूर्वी सावधगिरी बाळगावी,” असे आवाहन पोलिसांनी केले आहे.