अकोले- तालुक्यात अवैध दारू, गुटखा आणि मटक्याच्या विळख्याला आळा घालण्यासाठी आमदार डॉ. किरण लहामटे यांनी पोलिस आणि उत्पादन शुल्क विभागाला कडक कारवाईचे आदेश दिले. दारूमुळे वाढणारी गुन्हेगारी, आत्महत्या आणि सामाजिक बिघाड यावर चिंता व्यक्त करत त्यांनी दारू विक्रेते आणि गुटखा खाणाऱ्यांवरही कारवाईचा बडगा उगारला.
“निवडणुका, लग्नसमारंभ किंवा वाढदिवसाच्या नावाखाली उघडपणे होणारी दारूविक्री बंद झालीच पाहिजे. आम्ही कधीही दारूचं समर्थन करणार नाही,” असा ठाम इशारा लहामटे यांनी दिला.

दारूबंदीसाठी संयुक्त बैठक
अकोले येथील शासकीय विश्रामगृहात आमदार लहामटे यांच्या नेतृत्वाखाली पोलिस, उत्पादन शुल्क अधिकारी आणि कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीला खासदार भाऊसाहेब वाकचौरे, दारूबंदी चळवळीचे हेरंभ कुलकर्णी, उपविभागीय पोलिस अधिकारी कुणाल सोनवणे, पोलिस निरीक्षक मोहन बोरसे, राजूरचे सपोनि दीपक सरोदे, उत्पादन शुल्क निरीक्षक सहस्रबुद्धे, माजी जि.प. सदस्य जालिंदर वाकचौरे, विनय सावंत, मच्छिंद्र धुमाळ, महेश नवले, नितीन नाईकवाडी, प्रमोद मंडलिक यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. बैठकीत दारू, गुटखा आणि मटक्याच्या अवैध विक्रीवर कठोर कारवाईचा निर्णय घेण्यात आला. “ही मोहीम यशस्वी झाली, तर तालुका सामाजिकदृष्ट्या सक्षम होईल,” असं लहामटे यांनी सांगितलं.
दारूविरोधात आवाज
खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी दारूमुळे होणाऱ्या सामाजिक नुकसानावर भाष्य केलं. “दारूमुळे गरीब कुटुंबं उद्ध्वस्त होताहेत. साखर कारखान्यांनी दारू उत्पादनाला प्रोत्साहन दिल्याने हा विळखा वाढला. आता ड्रग्ससारख्या गंभीर समस्याही वाढताहेत. मी या दारूबंदी आंदोलनासोबत कायम राहीन,” असं त्यांनी ठासून सांगितलं. त्यांच्या या भूमिकेने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला. जालिंदर वाकचौरे यांनी तालुका दारूमुक्त करण्यासाठी प्रशासनाने कठोर पावलं उचलावीत, अशी मागणी केली. विनय सावंत यांनी उरूस आणि इतर समारंभांदरम्यान होणारी दारूविक्री थांबवण्याची गरज व्यक्त केली. “उरुसाच्या नावाखाली दारूचा बाजार भरतो. हे थांबलं पाहिजे,” असं सावंत म्हणाले.
अवैध विक्रीचं वास्तव
दारूबंदी चळवळीचे हेरंभ कुलकर्णी यांनी प्रास्ताविकात तालुक्यातील ४४ गावांमध्ये अवैध दारू सहज उपलब्ध असल्याचं सांगितलं. कार्यकर्त्यांनीही गावोगावच्या दारूविक्रीचं भयावह वास्तव मांडलं. “काही गावांमध्ये तर उघडपणे दारू विकली जाते. यामुळे तरुण पिढी बरबाद होतेय,” असं एका कार्यकर्त्याने सांगितलं. गुटखा विक्री आणि वापर यावरही चर्चा झाली. “गुटखा विक्रेत्यांना नोटीस द्या आणि खाणाऱ्यांवरही कारवाई करा,” असं लहामटे यांनी पोलिसांना बजावलं.
प्रशासनाची भूमिका
उपविभागीय पोलिस अधिकारी कुणाल सोनवणे यांनी दारूबंदी मोहिमेला पूर्ण पाठिंबा दर्शवला. “लवकरच तालुक्यातील ४४ गावांतील सरपंच आणि पोलिस पाटलांची बैठक बोलावली जाईल. दारू, गुटखा आणि मटक्याविरोधात सातत्याने आणि कठोर कारवाई केली जाईल,” असं त्यांनी आश्वासन दिलं. उत्पादन शुल्क विभागानेही अवैध दारूविक्री रोखण्यासाठी विशेष पथकं तयार करण्याची तयारी दर्शवली. “प्रशासनाने आम्हाला पाठबळ दिलं, तर ही मोहीम यशस्वी होईल,” असं एका कार्यकर्त्याने सांगितलं. बैठकीत संतोष मुर्तडक, अक्षय अभाळे, हरिभाऊ फापाळे, मंगेश कराळे यांच्यासह अनेकांनी सक्रिय सहभाग घेतला.