Pune Expressway : पुणेकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरे तर, गेल्या काही वर्षात राज्य रस्ते विकास महामंडळाकडून तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पुण्यातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी अनेक रस्ते विकासाच्या प्रकल्पांची कामे पूर्ण करण्यात आली आहेत.
शिवाय अनेक रस्ते विकासाच्या प्रकल्पांची कामे अजूनही सुरूच आहेत. दरम्यान, नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने एका महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे काम नुकतेसाठी घेतले आहे.

नगर रस्त्यावरील वाढत्या वाहतूककोंडीवर उपाय म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाने शिरूर-खेड-कर्जत असा मार्ग तयार करण्याचा निर्णय घेतला असून आता याच संदर्भात एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हा मार्ग 135 किमीचा आहे, हा मार्ग मराठवाड्यातून मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांसाठी हा उपयुक्त ठरणार असून प्रवाशांचा बहुमूल्य वेळ वाचणार आहे.
दरम्यान, याच प्रकल्पाच्या बाबतीत सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी नुकताच सविस्तर आढावा घेतला आहे अन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुढील आठवड्यात हा प्रकल्प सादर करण्यात येणार अशी माहिती त्यांनी यावेळी दिली आहे.
म्हणून या प्रकल्पाला पुढील आठवड्यात मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडूनही शासनाकडून प्रकल्पास लवकरच मंजुरी मिळणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हा पुणेकरांसाठी महत्त्वाचा असा मार्ग शिरूर-पाबळ-राजगुरुनगर-शिरवली मार्गे पाईट-वांद्रे-कर्जत असा जाणार आहे आणि पुढे तो पनवेल-उरणपर्यंत जोडला जाणार आहे. या प्रकल्पाबाबत बोलायचं झालं तर या प्रस्तावित मार्गावर पाच बोगदे, सहा मोठे पूल आणि 48 लहान पूल असतील.
यासाठी जवळपास 670 हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे अन यासाठी सुमारे 12 हजार कोटींचा खर्च अपेक्षित असल्याचा दावा करण्यात आला आहे. हा प्रकल्प बिल्ड ऑपरेट अँड ट्रान्सफर म्हणजेच बांधा वापरा आणि हस्तांतरित करा या तत्त्वावर विकसित होणार आहे.
बीओटी तत्त्वावर विकसित होणाऱ्या या पुण्यातील नव्या मार्गामुळे औद्योगिक व कृषी विकासाला नवी चालना मिळेल, असा विश्वास सुद्धा व्यक्त केला जात आहे. या परिसरातील नागरिकांना या प्रकल्पाचा मोठा फायदा होणार आहे.