श्रीगोंदा तालुक्यातील सिमेंट कारखान्याला शेतकऱ्यांचा विरोध, आमदार विक्रम पाचपुते यांची भूमिका संशयास्पद ?

निमगावखलू येथे सिमेंट कंपनीच्या प्रकल्पास शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे. बोगस माहितीवर तयार अहवाल, पर्यावरण व शेती धोक्यात येण्याची शक्यता यामुळे शेतकऱ्यांनी जनसुनावणीत आपली हरकत नोंदवून प्रकल्पाला विरोध दर्शवला

Published on -

Ahilyanagar News: श्रीगोंदा तालुक्यातील निमगावखलू येथे डालमिया भारत ग्रीन व्हिजन लिमिटेड या सिमेंट कंपनीच्या प्रस्तावित कारखान्याला स्थानिक शेतकऱ्यांनी कडाडून विरोध दर्शवला आहे. या प्रकल्पाविरोधातील हरकती नोंदवण्यासाठी सांगवी फाटा येथील मंगल कार्यालयात अपर जिल्हाधिकारी अरुण हुके यांच्या अध्यक्षतेखाली जनसुनावणी आयोजित करण्यात आली होती.

यावेळी शेतकऱ्यांनी कंपनीने बनावट माहिती गोळा करून प्रकल्पाचा अहवाल तयार केल्याचा गंभीर आरोप केला. कंपनीने पुरवलेली शाही जेवणाची व्यवस्था नाकारत शेतकऱ्यांनी घरून आणलेली चटणी-भाकरी आणि स्वखर्चाने खरेदी केलेली भेळ, वडापाव खात आपला निषेध व्यक्त केला. या कारखान्यामुळे भीमा नदीच्या काठावरील बागायती शेती उद्ध्वस्त होईल, असा दावा शेतकऱ्यांनी केला आहे.

शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा

जनसुनावणीत शेतकऱ्यांनी कंपनी आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना कठोर प्रश्न विचारत त्यांची कोंडी केली. ऑक्टोबर २०२४ मध्ये कंपनीने एजंट आणि दलालांमार्फत खोटी माहिती गोळा करून प्रकल्प अहवाल तयार केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. स्थानिक ग्रामस्थांना विश्वासात न घेता आणि त्यांच्या मंजुरीशिवाय हा अहवाल बनवल्याचे त्यांनी सांगितले. प्रकल्पामुळे होणारे पर्यावरणीय प्रदूषण आणि त्याचे शेतीवरील दुष्परिणाम लपवण्याचा प्रयत्न कंपनीने केल्याचा आक्षेप शेतकऱ्यांनी नोंदवला.

अधिकाऱ्यांना यापैकी एकाही प्रश्नाचे समाधानकारक उत्तर देता आले नाही, त्यामुळे त्यांनी नरमाईची भूमिका घेतली. शेतकऱ्यांनी प्रश्न केला की, स्थानिकांचा विरोध असताना हा प्रकल्प उभारण्याचा हट्ट का? यामुळे कंपनीच्या हेतूंवर संशय व्यक्त झाला.

शेतीला धोका

शेतकऱ्यांनी सिमेंट कारखान्यामुळे भीमा नदीच्या काठावरील सुपीक बागायती शेतीला धोका निर्माण होईल, अशी भीती व्यक्त केली. या प्रकल्पामुळे सुमारे ४९ गावांतील शेती आणि शेतकऱ्यांचे जीवनमान प्रभावित होईल. कारखान्यामुळे निर्माण होणारे रासायनिक प्रदूषण भीमा नदीच्या पाण्यातात मिसळू शकते, ज्याचा परिणाम पंढरपूर येथील चंद्रभागा नदीपर्यंत जाऊ शकतो.

यामुळे परिसरातील विहिरी, बोअर आणि पिण्याच्या पाण्याचे स्रोत दूषित होऊन स्थानिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. याशिवाय, १,२०० एकर क्षेत्रातील वनविभागाच्या जंगलात पशुपक्ष्यांचे नुकसान होईल, असा दावा शेतकऱ्यांनी केला. शेतकऱ्यांनी हा प्रकल्प बागायती भागात नको, तर औद्योगिक क्षेत्रात उभारावा, अशी मागणी केली.

जनसुनावणीतील उपस्थिती

जनसुनावणीत नाशिक विभागीय अधिकारी लिंबाजी भड, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपविभागीय अधिकारी चंद्रकांत शिंदे उपस्थित होते. माजी आमदार राहुल जगताप, बचाव कृती समितीचे अध्यक्ष शाहुराजे शिपलकर, केशव मगर, जीवन शिपलकर, गार सेवा संस्थेचे अध्यक्ष जितेंद्र मगर, विठ्ठलराव काकडे, राकेश पाचपुते आणि कृती समितीचे सचिव प्रा. सुनील माने यांनी शेतकऱ्यांचे नेतृत्व केले. मात्र, आमदार विक्रम पाचपुते यांच्या अनुपस्थितीमुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली. त्यांच्या मातोश्री प्रतिभा पाचपुते यांनी काष्टी जिल्हा परिषद गटाचे प्रतिनिधित्व केले आहे, त्यामुळे आमदारांनी शेतकऱ्यांच्या बाजूने उपस्थित राहणे अपेक्षित होते. त्यांच्या गैरहजरीमुळे ‘काहीतरी गडबड आहे’ अशी शंका शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

शेतकऱ्यांचा निर्धार

शेतकऱ्यांनी सिमेंट कारखान्याला कडाडून विरोध करत आपला लढा सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला. कंपनीने तयार केलेला प्रकल्प अहवाल चुकीचा आणि दिशाभूल करणारा असल्याचे त्यांनी सिद्ध केले. शेतकऱ्यांनी पर्यावरण, शेती आणि स्थानिकांच्या आरोग्याला होणारा धोका यावर ठामपणे आपली भूमिका मांडली. बचाव कृती समितीने कायदेशीर मार्गाने लढण्याची तयारी दर्शवली आहे. जर कंपनीने स्थानिकांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत, तर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News