Ahilyanagar Politics: अहिल्यानगर- आदिनाथ सहकारी साखर कारखाना निवडणुकीत विजयी झालेल्या संचालकांनी शनिवारी (३ मे) सायंकाळी विधान परिषदेतील सभापती प्रा. राम शिंदे यांची चौंडी येथील निवासस्थानी भेट घेतली. संचालक मंडळासमवेत शरद पवार गटाचे आमदार, तथा कारखान्याचे चेअरमन आ. नारायण आबा पाटील हेही उपस्थित होते.
अर्धा तास बंद दाराआड चर्चा
कारखान्यावर निर्विवाद वर्चस्व मिळवल्याबद्दल प्रा. राम शिंदे यांनी आमदार नारायण पाटील व सर्व संचालकांचा सत्कार केला. त्यानंतर शिंदे व पाटील यांच्यामध्ये बंद दाराआड तब्बल अर्धा तास बैठक झाली.

आदिनाथ साखर कारखान्याची निवडणूक
करमाळा तालुक्यातील आदिनाथ साखर कारखान्याची निवडणूक नुकतीच पार पडली. त्यात शरद पवार गटाचे आमदार नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने सत्ता मिळवली असली, तरी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी या निवडणुकीत आपल्याच पक्षाचे आ. नारायण पाटील यांच्या पॅनलविरोधात काम केले होते, तरीही आ. पाटील यांच्या पॅनेलने एकहाती सत्ता स्थापन केली. दरम्यान, चौंडी येथे मंगळवारी (६ मे) मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे.
या बैठकीच्या तयारीत प्रा. शिंदे हे व्यस्त असतानाच, आदिनाथ कारखान्याच्या नवनिर्वाचित संचालक मंडळाने शनिवारी सायंकाळी शिंदे यांची भेट घेतली. शिंदे यांनी कारखान्याचे चेअरमन, तथा आ. नारायण पाटील व सर्व संचालकांचा सत्कार केला. या वेळी कारखान्याचे उपाध्यक्ष महेंद्र पाटील यांच्यासह संचालक दत्तात्रय गव्हाणे, श्रीमान चौधरी, महादेव पोरे, वसंत अंबारे, रविकिरण फुके, दशरथ हजारे, किरण कडवे, नवनाथ झोळ उपस्थित होते.
राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
दरम्यान, शिंदे व पाटील यांच्यात बंद दाराआड अर्धा तास चर्चा झाली. मात्र, त्याचा तपशील समजू शकला नाही. आदिनाथ कारखान्याच्या निवडणुकीत प्रा. राम शिंदे व आ. रोहित पवार यांनी मोठ्या प्रमाणावर आपली ताकद लावली होती. या पार्श्वभूमीवर या भेटीला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे.