Longest Expressway in India : भारतातील सर्वात लांब एक्सप्रेस-वे कोणता ? या प्रश्नाचं उत्तर अनेकांना माहीत नसेल. मात्र आम्ही आज या प्रश्नाचं उत्तर देतोय. दिल्ली-वडोदरा-मुंबई एक्सप्रेस-वे हा देशातील सर्वात लांब एक्सप्रेसवे आहे. त्याची लांबी 1350 किलोमिटर आहे. पंतप्रधान मोदींनी या एक्सप्रेस-वेच्या वडोदरा-मुंबई ट्रेंचचे नुकतेच उद्घाटन केले असून हा एक्सप्रेस-वे येत्या काही दिवसांत पूर्ण होणार आहे.
सर्वात लांब महामार्ग
दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवे मार्ग भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून तयार केला जात आहे. हा भारतातील आतापर्यंतचा सर्वात मोठा एक्सप्रेसवे प्रकल्प आहे. या प्रकल्पाचा अंदाजे खर्च १ लाख कोटी रुपये आहे. हा देशातील सर्वात लांब आणि व्यस्त एक्सप्रेसवे असेल. त्याची लांबी 1350 किलोमिटर आहे. गेल्या वर्षी जानेवारीमध्ये पंतप्रधान मोदींनी दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेच्या २४६ किमी लांबीच्या दिल्ली-दौसा-लालसोट ब्लॉकचे उद्घाटन केले होते.

कसा होईल फायदा?
सध्या दिल्ली ते मुंबई या प्रवासाला २४ तास लागतात. मात्र हा एक्सप्रेस-वे सुरु झाल्यावर हाच वेळ निम्म्यावर येणार आहे. म्हणजेच, मुंबई ते दिल्ली या प्रवासाचे अंतर फक्त १२ तासांत पूर्ण होणार आहे. या एक्सप्रेसवेमुळे देशाची राजधानी व राज्याची राजधानी या दोन्ही शहरांचे अंतर निम्याने कमी होणार असून, दोन्ही शहरांची कनेक्टीव्हीटी पूर्वीपेक्षा जास्त वाढणार आहे.
कोणत्या सुविधा असणार?
सुमारे 1350 किलोमिटर लांबीचा हा महामार्ग कोटा, इंदूर, जयपूर, भोपाळ, वडोदरा आणि सुरत या प्रमुख मार्गांना जोडणार आहे. या संपूर्ण एक्सप्रेस वेवर ३० लेन टोल प्लाझा बांधले जात आहेत. त्यामुळे वाहने जाण्यासाठी लागणारा प्रतीक्षा वेळ १० सेकंदांपेक्षा कमी होतो. या एक्सप्रेस वेवर प्रवाशांच्या सोयीसाठी कार पार्किंग, पेट्रोल पंप, रेस्टॉरंट, सेवाक्षेत्र, शौचालये, मुलांसाठी खेळण्याची जागा इत्यादींची व्यवस्था केली जात आहे. हा भारतातील पहिला एक्सप्रेसवे असेल ज्यामध्ये २.५ किमी लांबीचे वन्यजीव क्रॉसिंग म्हणजेच जंगलही असेल.
कोणत्या राज्यांना जोडणार?
हा एक्सप्रेसवे एकूण सहा राज्यांमधून जातो. या राज्यांमध्ये दिल्ली, हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्र यांचा समावेश आहे. हा एक्स्प्रेस वे गुडगाव येथून सुरू होऊन राजस्थानमधील जयपूर आणि सवाई माधोपूर, मध्य प्रदेशातील रतलाम आणि गुजरातमधील वडोदरामार्गे मुंबईला पोहोचेल.
किती काम पूर्ण झाले?
या भागाचा बराचसा भाग अजूनही बांधकामाधीन आहे, परंतु अनेक महत्त्वाचे भाग पूर्ण झाले आहेत. यापैकी काहींवर वाहतूक चाचण्या देखील सुरू झाल्या आहेत. या एक्सप्रेसवेमध्ये अनेक खास वैशिष्ट्ये आहेत, ज्यात स्मार्ट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टमचा समावेश आहे. ज्या अंतर्गत येथे सेन्सर्स, सीसीटीव्ही आणि आपत्कालीन कॉल सुविधा, प्रदूषण आणि आवाज कमी करण्यासाठी ग्रीन बेल्ट डिव्हायडर आणि इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन बांधले जात आहेत.