Ahilyanagar News: कर्जत- शहरातील समर्थ गार्डन, जे एकेकाळी हिरवळीने नटलेलं आणि शहरवासीयांचं आकर्षण होतं, आज मात्र ओसाड आणि उद्ध्वस्त अवस्थेत आहे. झाडं कोरडी पडली, गवत पिवळं झालं, करंज्यांवर धूळ साचली आणि कचऱ्याचे ढीग लागलेत. पाण्याच्या नियोजनाअभावी आणि देखभालीच्या कमतरतेमुळे हे गार्डन आज केवळ सांगाड्याच्या स्वरूपात उभं आहे. स्थानिकांच्या मते, विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे आणि आमदार रोहित पवार यांच्यातील राजकीय वैरामुळे हे सुंदर उद्यान सुकून गेलंय. शहरवासीयांनी या गार्डनच्या पुनरुज्जनासाठी नगरपंचायतीकडे मागणी केली आहे.
समर्थ गार्डनचा इतिहास
कर्जत नगरपंचायतीच्या निवडणुकीदरम्यान तत्कालीन पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी शहरासाठी आकर्षक बगीचा उभारण्याचं आश्वासन दिलं होतं. भाजपची सत्ता आल्यानंतर त्यांनी स्वामी समर्थनगर येथे सुमारे एक कोटी रुपये खर्चून समर्थ गार्डन उभारलं. या गार्डनमध्ये रंगीबेरंगी करंजं, हिरवं गवत, मनमोहक फुलझाडं, मुलांसाठी खेळण्याची जागा, फिरण्यासाठी पायवाट आणि रात्रीच्या वेळी चमकणारी प्रकाशयंत्रणा होती. या गार्डनमुळे कर्जतच्या सौंदर्यात भर पडली, आणि कुटुंबांना एकत्र येण्यासाठी सुंदर जागा मिळाली. स्थानिकांना रोजगारही मिळाला. पण २०१९ मध्ये शिंदे यांचा पराभव आणि २०२२ मध्ये नगरपंचायतीत भाजपची सत्ता जाऊन रोहित पवार यांच्या गटाची सत्ता आल्यानंतर या गार्डनकडे दुर्लक्ष झालं.

कोनशिलेचा वाद आणि गार्डनची दुर्दशा
२३ नोव्हेंबर २०२० रोजी प्रा. राम शिंदे आणि तत्कालीन खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते समर्थ गार्डनचं लोकार्पण झालं. पण या लोकार्पणाच्या कोनशिलेवर आमदार रोहित पवार यांचं नाव नसल्याने वाद निर्माण झाला होता. त्यानंतर सत्तांतर झालं, आणि ही कोनशिला अचानक गायब झाली. सध्या नगरपंचायतीत शिंदे यांच्या समर्थक नगरसेवकांची सत्ता आहे, पण गार्डनची अवस्था जैसे थे आहे. पाण्याच्या नियोजनाअभावी झाडं सुकली, गवत पिवळं पडलं आणि कचऱ्याचे ढीग साचले. करंज्यांचीही दुरवस्था झाली आहे. या गार्डनचं सौंदर्य टिकवण्यासाठी कोणतेही ठोस पाऊल उचललं गेलं नाही.
नागरिक आणि सामाजिक संघटनांची मागणी
कर्जतच्या सामाजिक संघटनांनी गेल्या १,६८५ दिवसांपासून निसर्ग संवर्धनासाठी सातत्याने काम केलं आहे. त्यांनी शहर आणि परिसर हिरवागार करण्यात मोठी भूमिका बजावली आहे. पण समर्थ गार्डनची आजची अवस्था पाहून त्यांचंही मन हेलावतं. सेवानिवृत्त वन अधिकारी आणि सामाजिक संघटनांचे मार्गदर्शक अनिल तोरडमल यांनी सांगितलं की, समर्थ आणि शहा गार्डन हे कर्जतच्या वैभवाचं प्रतीक आहे. त्यांचं जतन करणं गरजेचं आहे. सामाजिक संघटनांनी गार्डनच्या संवर्धनासाठी नगरपंचायतीने जबाबदारी दिल्यास ती निस्वार्थपणे पार पाडण्याची तयारी दर्शवली आहे. स्थानिक नागरिकांनीही प्रा. राम शिंदे यांनी या गार्डनकडे लक्ष द्यावं, अशी मागणी केली आहे.
नगरपंचायतीचं आश्वासन
प्रभारी मुख्याधिकारी अजय साळवे यांनी सांगितलं की, कर्जतचे नियमित मुख्याधिकारी जायभाये रजेवर असल्याने त्यांच्याकडे अतिरिक्त प्रभार आहे. समर्थ गार्डनच्या समस्येवर येणाऱ्या सर्वसाधारण सभेत चर्चा होईल, आणि नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सर्व सदस्यांना याबाबत विनंती केली जाईल. नुकताच जिल्हा वार्षिक योजनेचा निधी मंजूर झाला आहे, त्यातून गार्डनच्या देखभालीसाठी निधी आणि कामांचं नियोजन प्रस्तावित करण्यात येईल, असं त्यांनी सांगितलं. यामुळे नागरिकांना गार्डन पुन्हा हिरवं आणि सुंदर होण्याची आशा निर्माण झाली आहे.