वैद्यकीय महाविद्यालय शिर्डीला नेण्याचा घाट ! खा. नीलेश लंके यांचा आरोप विखे पिता-पुत्रांचे नाव न घेता साधला निशाणा

Published on -

केंद्र सरकारने अहिल्यानगर जिल्ह्यासाठी मंजुर केलेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तात्काळ सुरू करण्याच्या नावाखाली शिर्डी येथे नेण्याचा घाट घातला असून त्यास आपण तिव्र विरोध करू असे सांगतानाच जिल्हयातील सर्व तालुक्यातील नागरिकांना या महाविद्यालयाचा लाभ व्हावा यासाठी जिल्हयाचे मध्यवर्ती ठिकाण अहिल्यानगर येथेच हे महाविद्यालय सुरू करावे अशी आग्रही मागणी खासदार नीलश लंके यांनी सोमवारी अहिल्यानगर येथे पत्रकारांशी बोलताना केली.

यावेळी बोलताना खा. लंके म्हणाले, अहिल्यानगर जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय झाले पाहिजे यासाठी आपण लोकसभा निवडणूकीनंतर प्राधान्य दिले. २३ ऑगस्ट रोजी आपण या महाविद्यालयासाठी केंद्र सरकारला पहिले पत्र दिले. त्यानंतरही पत्रव्यवहार करून पाठपुरावा करण्यात येत होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय शिक्षा मंत्री धमेंद्र प्रसाद, मंत्र जगतप्रकाश नड्डा या मंत्र्यांचीही भेट घेण्यात आली. जिल्ह्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजुर झाल्याने आपल्या पाठपुराव्यास यश आले.

शहरापासून १० किमीच्या अंतरावर महाविद्यालय हवे

मंजुर झालेले वैद्यकीय महाविद्यालय अहिल्यानगर शहराच्या जवळ १० किलोमीटर अंतरावर झाले पाहिजे अशी आमची सुरूवातीपासूनची मागणी आहे. या महाविद्यालयाचा फायदा जिल्हा रूग्णालयास होणार असून शहराच्या विकासातही त्यामुळे भर पडणार आहे. आपण कोणत्या तालुक्यात राहतो यापेक्षा आपला जिल्हा महत्वाचा असतो. आज प्रत्येक आमदार, खासदार यांना आपल्याच तालुक्यात हे महाविद्यालय सुरू झाले पाहिजे असा आग्रह धरला जात आहे.

खासदार नीलेश लंके

मुख्यमंत्री, कमिटीशी पत्रव्यवहार करणार

नगर शहरालगत हे महाविद्यालय व्हावे यासंदर्भात आपण जिल्हाधिकाऱ्यांचीही भेट घेतली आहे. हे महाविद्यालय सुरू करण्यासाठी तीन व्यक्तींची कमिटी स्थापन करण्यात आली असून ही कमिटीही जिल्ह्यात येऊन गेली आहे. हे महाविद्यालय नगरच्या जवळ व्हावे यासाठी आपण मुख्यमंत्र्यांसह कमिटीलाही पत्रव्यवहार करणार आहोत. या महाविद्यालयासाठी २५ ते ३० एकर जागा उपलब्ध करून देण्यासंदर्भात आपण जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. या महाविद्यालयासाठी आपण काही जागाही सुचविलेल्या आहेत. नगर शहरालगत इंद्रायणी हॉटेल लगत तसेच अरणगांव येथे टीबी हॉस्पिटलची जागा उपलब्ध आहे. ही जागा महाविद्यालयासाठी देण्यात यावी अशी मागणी खा. लंके यांनी यावेळी केली.

जिल्ह्याच्या हिताचा विचार करा

एखाद्या पदाधिकाऱ्याच्या अट्टहासापाई हे महाविद्यालय एखाद्या तालुक्यात जाऊ नये अशी आमची भूमिका आहे. ज्यावेळी तुम्ही जिल्ह्याचे नेते म्हणून काम करता त्यावेळी तुमची भूमिका सर्वसमावेशक असली पाहिजे. जिल्ह्याच्या हिताचा विचार केला पाहिजे अशी मागणी खा. लंके यांनी केली.

कामगार हॉस्पिटललाही मंजुरी

मध्यंतरी आपण एक कामगार हॉस्पिटललाही मंजुरी मिळविली असून हे हॉस्पिटलही नगर शहराच्या परिसरातच व्हावे अशी आमची मागणी आहे. त्यासाठी निंबळक येथे जागा सुचविण्यात आली आल्याचे खा. लंके यांनी सांगितले.

काळाची पावले माझ्या लक्षात येतात !

काळाची पावले माझ्या लक्षात येतात. हे वैद्यकीय महाविद्यालय एका विशिष्ठ भागात नेण्याचा प्रयत्न होऊ शकतो. किंवा होत आहे. सत्तेचा गैरवापर करून तोंडी सुचना दिल्या जाऊ शकतात. विमानतळ शिर्डीला नेण्यात आले. उद्या हे महाविद्यालयही शिर्डीला जाऊ नये. कारण शिर्डी येथे साईबाबा संस्थानचे मोठे हॉस्पिटल आहे. शिर्डीबाबात माझे दुमत नाही, परंतू शिर्डी एका कोपऱ्याला पडते. अहिल्यानगर हे जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही नगर शहरालगत हे महाविद्यालय सुरू करण्यासंदर्भातील सुचना दिल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी आपणास सांगितल्याचे खा. लंके यांनी सांगितले.

कोणत्या खासदाराने संसदेत प्रश्न उपस्थित केला ?

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावे अशी त्यांची इच्छाशक्ती नव्हती. या जिल्ह्याने अनेक खासदार दिले. कोणत्या खासदाराने संसदेत शासकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी संसदेत प्रश्न उपस्थित केला का ? मी खासदार झाल्यानंतर मी संसदेत आवाज उठविला. सुप्रियाताई सुळे यांच्या माध्यमातून विविध मंत्र्यांच्या भेटी घेतल्याचे खा. लंके यांनी सांगितले.एकीकडे शासकीय जागेवर अतिक्रमण करण्यासाठी तुम्हाला जागा उपलब्ध झाली, मग वैद्यकीय महाविद्यालयासाठी जागा उपलब्ध होत नाही असे होऊच शकत नाही.

वेळप्रसंगी आंदोलन

हे महाविद्यालय नगरजवळच झाले पाहिजे ही माझी मागणी असून वेळप्रसंगी त्यासाठी आंदोलन करण्याची वेळ आली तरी आपण मागे हटणार नाही. एका बाजूला वैद्यकीय महाविद्यालय घेऊन जाण्यामागे नेमका काय हेतू आहे ? सर्व पक्षीय आमदार खासदारांनी हीच भूमिका घेऊन आपआपल्या पक्षाच्या नेतेमंडळींकडे तसा आग्रह धरला पाहिजे असे खा. लंके म्हणाले.

नगरला तात्काळ महाविद्यालय सुरू होईल

दक्षिण भागातील अनेक प्रकल्प उत्तरेत नेले जात आहेत. याचा अर्थ दक्षिणेतील पुढारी कुठेतरी कमी पडतात असे मला वाटते. हे वैद्यकीय महाविद्यालय साईबाबा ट्रस्टच्या हॉस्पिटलला जोडून तात्काळ सुरू करण्याचा घाट घातला जात असल्याची आपल्याकडे माहीती आहे. तात्काळ सुरू करण्याच्या नावाखाली महाविद्यालय शिर्डीला नेऊन तिकडेच ठेवण्याचा हा डाव आहे. नगर शहरातही तात्काळ महाविद्यालय सुरू होऊ शकेल. शासकीय रूग्णालयाचा त्याचा उपयोग होईल असे लंके म्हणाले.

शहराच्या विकासाला हातभार लागेल

संभाजीनगर, नाशिकच्या बरोबरीने नगरलाही महानगरपालिका झाली आहे. दोन्ही शहरे विकसीत झालेली असताना नगरची परिस्थिती काय आहे ? शासकीय महाविद्यालय, कामगार रूग्णालय नगरजवळ झाल्यास नगर शहराच्या विकासाला हातभार लागेल.

जिल्ह्याचे विभाजन योग्य

नगर जिल्हयाचे विभाजन झाले तर अधिकाऱ्यांना अधिक सुक्ष्मपणे काम करता येईल. सुक्ष्म कामासाठी जिल्ह्याचे विभाजन योग्य आहे. कोणाची काय भूमिका आहे याच्याशी मला देणे घेणे नाही. याचा राजकीय अर्थ काढता कामा नये.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नगर येथेच सुरू करण्याच्या मागणीचे निवेदन खासदार नीलेश लंके यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe