Multibagger Stock 2025:- आज शेअर बाजारात एक नाव विशेष चर्चेत आलं व ते म्हणजे अॅक्सिसकेड्स टेक्नॉलॉजीज. मंगळवारीच्या व्यवहारात या कंपनीच्या शेअरने जोरदार उसळी घेतली. दिवसाअखेर अॅक्सिसकेड्सचा भाव थेट १२७८ रुपयांपर्यंत पोहोचला आणि ५ टक्क्यांनी वाढत वरच्या सर्किटला जाऊन भिडला.यामागे कारणही तसंच मोठं आहे व ते म्हणजे कंपनीने युरोपमधील एका मोठ्या संरक्षण कंपनीसोबत सामंजस्य करार केला आहे.
या शेअर्समध्ये गुंतवणूकदारांची उत्सुकता का?
या करारामुळे अॅक्सिसकेड्सच्या शेअर्समध्ये गुंतवणूकदारांची उत्सुकता वाढली. ही कंपनी भारतात संरक्षण क्षेत्रासाठी प्रगत प्रणाली तयार करणार असून त्यासाठी युरोपमधील इंद्रा या नामवंत कंपनीसोबत हातमिळवणी केली आहे. संरक्षण, एरोस्पेस आणि धोरणात्मक प्रणालींमध्ये काम करणाऱ्या इंद्रा कंपनीसोबत अॅक्सिसकेड्सने एकत्र येत भारतीय बाजारात संरक्षण सिस्टीम तयार करण्याचं ठरवलं आहे.

या कराराअंतर्गत काही खास उपकरणं भारतात विकसित केली जाणार आहेत. जसं की टॅक्टिकल एअर नेव्हिगेशन सिस्टमसाठी अँटेना, विमानांना उड्डाणादरम्यान दिशा देणारं अंतर मोजण्याचं उपकरण (DME) आणि क्षेपणास्त्रांपासून संरक्षण करणारी काउंटरमेजर सिस्टीम. हे सगळं तंत्रज्ञान इंद्राने आधीच यशस्वीपणे विकसित केलेलं आहे, आणि आता ते भारतात तयार होणार आहे.
अॅक्सिसकेड्सने सांगितलं की हे दोन्ही कंपन्यांचं भागीदारीचं पाऊल केवळ भारतापुरतं मर्यादित नाही. ते जागतिक बाजारपेठेतील संधीही शोधणार आहेत. ग्राहकांच्या गरजेनुसार विद्यमान उत्पादनांना सुधारित करणे किंवा नव्यानं उत्पादन तयार करणं, हे देखील यामध्ये अपेक्षित आहे.
या सगळ्या घडामोडींमुळे अॅक्सिसकेड्सच्या शेअरमध्ये गेल्या काही महिन्यांत सातत्यानं वाढ झाली आहे. वर्षाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत या स्टॉकने तब्बल १०२ टक्क्यांची झेप घेतली आहे. अलीकडेच कंपनीने नव्या रणनीतीसाठी रविकुमार जोगी यांची मुख्य रणनीती आणि विपणन अधिकारी म्हणून नियुक्ती केली होती, याचा प्रभावही गुंतवणूकदारांच्या मनावर दिसून आला.
बेंगळुरूस्थित अॅक्सिसकेड्स ही कंपनी एरोस्पेस, संरक्षण, ऊर्जा, ऑटोमोटिव्ह आणि अवजड अभियांत्रिकी क्षेत्रात काम करते. एंड-टू-एंड अभियांत्रिकी व तांत्रिक समाधान देणारी ही कंपनी आता संरक्षण क्षेत्रात जागतिक पातळीवर पाऊल ठेवत असल्यामुळे तिच्या पुढील वाटचालीकडे बाजाराचं लक्ष लागलेलं आहे.