Smallcap Stocks India:- बुधवारी शेअर बाजारात एक लक्षणीय घडामोड घडली.आकाश एक्सप्लोरेशन सर्व्हिसेस या गुजरातमधील छोट्या कंपनीचे शेअर्स जवळपास २० टक्क्यांनी उसळले. ही उसळी काही अफवांमुळे नाही, तर थेट ओएनजीसीकडून (ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन) मिळालेल्या मोठ्या ऑर्डरमुळे आली आहे. कंपनीला मिळालेली ही ऑर्डर सुमारे ₹१९.३६ कोटींची असून, पुढील तीन वर्षांसाठी आहे.
काय आहे नेमका करार?
या कराराअंतर्गत, आकाश एक्सप्लोरेशन अहमदाबादच्या प्रकल्पात वापरण्यासाठी ५० मेट्रिक टन क्षमतेची वर्कओव्हर रिग भाड्याने देणार आहे. ही एक तांत्रिक सेवा असून तेल उत्खननासाठी उपयुक्त आहे. विशेष म्हणजे, याआधी देखील कंपनीला ऑइल इंडिया या आणखी एका सरकारी क्षेत्रातील कंपनीकडून ₹२९ कोटींचे कंत्राट मिळाले होते. त्या ऑर्डरमध्ये उच्च-दाब मोबाइल बॉयलर आणि इतर सहाय्यक उपकरणांची पूर्तता करायची आहे.

कंपनीची पार्श्वभूमी पाहिली तर, आकाश एक्सप्लोरेशन सर्व्हिसेस लिमिटेड ही भारतात तेल आणि वायू शोधण्याच्या क्षेत्रात सेवा पुरवणारी कंपनी आहे. तिचे मुख्यालय अहमदाबाद येथे आहे आणि आंतरराष्ट्रीय ड्रिलिंग संस्थांशी तिचे संबंध आहेत. कंपनीची ध्येय धोरण स्पष्ट आहे व ते म्हणजे तेल व वायू क्षेत्रात आघाडीचा सेवा पुरवठादार बनणे.
मात्र, कंपनीचा आर्थिक ट्रॅक रेकॉर्ड पाहता थोडेसे सावध राहणे योग्य ठरेल. मार्च २०२५ ला संपलेल्या तिमाहीत तिचा नफा तब्बल ९२ टक्क्यांनी घसरला होता.फक्त ₹०.२८ कोटींवर आला, जो मागील वर्षी ₹३.५१ कोटी होता. विक्रीही कमी झाली असून ती ₹३०.८९ कोटींवरून ₹२५.७७ कोटींवर आली आहे.
तरीही, शेअर बाजारात या कंपनीच्या शेअर्सना चांगली मागणी दिसून आली. आज NSE वर तिचा शेअर ₹९.०१ या किंमतीला उघडला, पण दिवसाअखेरीस ₹१०.५१ या सर्वोच्च पातळीवर पोहोचला. काही विश्लेषकांच्या मते, शेअरने आज २०० दिवसांच्या सरासरीचा स्तर पार केला असून त्यात सकारात्मक गती दिसत आहे.
गेल्या काही दिवसांत हा शेअर चर्चेचा विषय ठरला आहे. काहींचा विश्वास आहे की येत्या काळातही याचा चढता कल सुरू राहू शकतो. सध्या ₹१२ च्या आसपासचा पातळी ही एक महत्त्वाची अडथळा ठरू शकते, तर ₹९.५० ही शेअरची तातडीची आधाररेषा मानली जात आहे.