विशाल मेगा मार्ट शेअरमध्ये ब्रेकआऊट! किंमत 175 रुपये पोहोचणार…काय आहे रहस्य?

Published on -

Vishal Mega Mart Share Price:- आजच्या शेअर बाजारात विशाल मेगा मार्ट या कंपनीच्या शेअर्समध्ये उत्साह दिसून आला. दिवसाची सुरुवात सौम्य झाली असली तरी बाजार उघडल्यानंतर हळूहळू खरेदीचा जोर वाढत गेला आणि दिवसभरात शेअर जवळपास २.६ टक्क्यांनी वधारला. यामागचं प्रमुख कारण म्हणजे देशातील मोठ्या म्युच्युअल फंड संस्थांनी कंपनीचे मोठ्या प्रमाणात शेअर्स खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे.

विशाल मेगा मार्टमधील आर्थिक घडामोड

विशेष म्हणजे, विशाल मेगा मार्टमधील एका मोठ्या प्रवर्तकाने म्हणजेच ‘समयत सर्व्हिसेस एलएलपी’ या कंपनीने आपला १९.६ टक्क्यांचा हिस्सा विकला आहे. या व्यवहाराची एकूण किंमत सुमारे १०,२२० कोटी रुपये इतकी होती. हे शेअर्स बाजारात दोन स्वतंत्र व्यवहारांत विकले गेले, ज्यामध्ये एकूण ९० कोटी शेअर्सचा समावेश होता. प्रत्येक शेअर ₹११३.५० ते ₹११३.६० या दरात विकला गेला. या विक्रीनंतर प्रवर्तकाचा हिस्सा ७४.५५ टक्क्यांवरून कमी होऊन ५४.९७ टक्क्यांवर आला आहे.

या विक्रीनंतर बाजारात खरेदीदारांची चांगलीच झुंबड उडाली. एचडीएफसी म्युच्युअल फंडने एकट्याने १५ कोटींहून अधिक शेअर्स खरेदी केले, ज्यामुळे त्यांचा कंपनीतील हिस्सा २.७१ टक्क्यांवरून ५.९४ टक्क्यांवर पोहोचला आहे. इतकंच नव्हे तर, एसबीआय म्युच्युअल फंडने १६.५८ कोटी शेअर्स घेतले. जे ३.६१ टक्क्यांच्या हिस्स्याशी समतुल्य आहेत, तर कोटक म्युच्युअल फंडनेही ७.९५ कोटी शेअर्स विकत घेऊन १.७३ टक्के हिस्सेदारी घेतली आहे.

बाजाराच्या व्यवहारावर नजर टाकल्यास, शेअरने दिवसाची सुरुवात ₹१२१.६२ पासून केली. काही वेळातच तो वाढून ₹१२६.१६ या उच्चांकाला गेला आणि त्यानंतर थोडा घसरून दुपारी १:१५ वाजता ₹१२३.९१ या दरावर ट्रेड करत होता. दिवसातील नीचांकी पातळी ₹११९.५१ इतकी नोंदवण्यात आली होती.

तज्ञांचे मत काय?

विश्लेषकांचा मतानुसार, विशाल मेगा मार्टचा शेअर सध्या मजबूत ट्रेंडमध्ये आहे. लक्ष्मीश्री इन्व्हेस्टमेंट्सचे रिसर्च हेड अंशुल जैन यांच्या मते, गेल्या काही आठवड्यांपासून या शेअरचा व्यवहार ₹९६ ते ₹११७ च्या रेंजमध्ये अडकलेला होता. मात्र अलीकडील व्यवहार पाहता, हा शेअर त्या कक्षेतून बाहेर पडल्याचं स्पष्ट दिसत आहे, ज्याला बाजारातील तज्ज्ञ ‘ब्रेकआउट’ मानतात.

जैन यांचा अंदाज आहे की शेअर आता वधारत जाईल आणि पुढील काही आठवड्यांत तो ₹१७५ च्या पातळीपर्यंत जाऊ शकतो. सध्या मोठ्या संस्थात्मक गुंतवणुकीमुळे शेअरमध्ये स्थैर्य आणि विश्वास निर्माण झाला आहे, जो किरकोळ गुंतवणूकदारांसाठीही महत्त्वाचा संकेत मानला जातो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!