Indosolar Share Price:- आज शेअर बाजारात एक धक्कादायक घडामोड घडली.अनेकांना नावही माहीत नसलेल्या इंडोसोलर लिमिटेड या सोलर सेल उत्पादक कंपनीच्या शेअरने अवघ्या एका दिवसात तब्बल १७०० टक्क्यांची उसळी घेतली. या शेअरने आज सकाळी बाजारात ₹१६५.०६ या नव्या दराने पुनरागमन केलं आणि व्यवहाराच्या दरम्यान त्याने ₹१७३.३१ चा उच्चांक गाठला. विशेष म्हणजे, या शेअरची मागील बंद किंमत अवघी ₹९.७१ होती. त्यामुळे बाजारात खळबळ उडाली आणि सर्वांचं लक्ष या शेअरवर केंद्रित झालं.
इंडोसोलरचा शेअर व्यवहारातून होता निलंबित
मूळात इंडोसोलरचा शेअर मागील तीन वर्षांपासून व्यवहारातून निलंबित होता. जून २०२२ मध्ये शेवटचा व्यवहार झाला होता, आणि त्यावेळी तो केवळ ₹३.२१ दराने बंद झाला होता. त्यानंतर कंपनी आर्थिक अडचणींमध्ये अडकली होती. २०१८ मध्ये कंपनीला दिवाळखोरीच्या कारवाईला सामोरे जावे लागले होते, जेव्हा कर्जदारांनी तिच्याविरोधात प्रक्रिया सुरू केली होती. मात्र आता, हीच कंपनी नवी उर्जा घेऊन पुन्हा बाजारात अवतरली आहे.

या पुनरागमनामागील महत्वाचे कारण
यामागे एक मोठं कारण म्हणजे वारी एनर्जीज लिमिटेड या सौरउर्जेतील आघाडीच्या कंपनीने इंडोसोलरचं अधिग्रहण केलं आहे. वारी एनर्जीजने मार्च २०२५ अखेरपर्यंत इंडोसोलरमध्ये ४ कोटी शेअर्स खरेदी करून ९६ टक्क्यांहून अधिक हिस्सेदारी मिळवली आहे. अधिग्रहणानंतर कंपनीची आर्थिक स्थितीही सुधरताना दिसत आहे. आर्थिक वर्ष २०२५ मध्ये कंपनीने ५५ कोटींचा नफा नोंदवला आहे, तर त्याच वर्षभरापूर्वी ती १५ कोटींच्या तोट्यात होती. या बदलाने बाजाराला विश्वास वाटू लागला आहे की इंडोसोलर आता केवळ नावापुरती नव्हे, तर व्यवहारिकदृष्ट्याही स्थिरतेकडे वाटचाल करत आहे.
आजपासून इंडोसोलरचे शेअर्स ‘WAAREEINDO’ या स्क्रिप आयडी अंतर्गत व्यवहारात आले आहेत आणि ‘T’ ग्रुप अंतर्गत सूचीबद्ध करण्यात आले आहेत. याचा अर्थ असा की पहिल्या दहा ट्रेडिंग सत्रांमध्ये या शेअरमध्ये इंट्राडे व्यवहार करता येणार नाही आणि दररोज फक्त ५ टक्क्यांची किंमतीची मर्यादा असेल.
कंपनीने एक्सचेंजला दिलेल्या परिपत्रकात काय म्हटले?
कंपनीने एक्सचेंजला दिलेल्या पत्रकात म्हटलं आहे की १७ जून रोजी NSE आणि BSE दोन्हीकडून शेअरची लिस्टिंग मंजूरी मिळाल्यामुळे १९ जूनपासून तो पुन्हा व्यवहारासाठी खुला झाला आहे. काही दिवसांपूर्वीपर्यंत पेनी स्टॉक म्हणून दुर्लक्षित राहिलेल्या या कंपनीने बाजारात जोरदार पुनरागमन केलं आहे, हे मात्र नक्की.
जरी अशा झपाट्याने वाढलेल्या शेअर्सकडे आकर्षण वाटत असलं, तरी त्यामागचं संपूर्ण चित्र समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. कारण यामागे एखादी मजबूत योजना असू शकते, किंवा केवळ तात्पुरता भाववाढीचा खेळही असू शकतो. मात्र एक गोष्ट स्पष्ट आहे की इंडोसोलरचा आजचा दिवस शेअर बाजाराच्या इतिहासात लक्षात राहील असा ठरला.