येतोय ‘हा’ धमाकेदार IPO… ग्रे मार्केटमध्ये उसळी! गुंतवणुकीसाठी तयारी करा…

Published on -

HDB Financial Services IPO:- आज शेअर बाजाराच्या वर्तुळात HDB Financial Services च्या IPO ची घोषणा खूप गाजते आहे. कारण ही कोणतीही लहान-मोठी कंपनी नाही, तर एचडीएफसी बँकेचीच एक मोठी संस्था आहे. २५ जूनपासून सर्वसामान्य गुंतवणूकदारांसाठी हा IPO खुला होणार आहे आणि २७ जूनपर्यंत अर्ज करता येईल. त्याआधी, २४ जून रोजी अँकर गुंतवणूकदारांसाठी हा IPO खुला करण्यात येणार आहे. यामुळे बाजारात उत्सुकता आणि हालचाल दोन्ही वाढल्या आहेत.

या आयपीओची लॉट साईज किती?

HDB Financial Services ने आपल्या IPO साठी ₹७०० ते ₹७४० एवढा किंमतपट्टा निश्चित केला आहे. यातून गुंतवणूक करणाऱ्यांना २० शेअर्सच्या एका लॉटसाठी किमान ₹१४,८०० गुंतवावे लागतील. म्हणजेच छोट्या गुंतवणूकदारांसाठी सुरुवात थोडी मोठी असली तरी कंपनीच्या भक्कम पार्श्वभूमीमुळे रस निर्माण होतोय. एकूण IPO चा आकार तब्बल ₹१२,५०० कोटी रुपयांचा आहे, ज्यात ₹३.३८ कोटी शेअर्स फ्रेश इश्यूद्वारे विकले जातील, तर ₹१३.५१ कोटी शेअर्स ऑफर फॉर सेल अंतर्गत विक्रीस येणार आहेत.

ग्रे मार्केटमधील स्थिती काय?

या IPO चं लिस्टिंग बीएसई आणि एनएसई या दोन्ही प्रमुख एक्स्चेंजवर होणार आहे. विशेष म्हणजे, ग्रे मार्केटमध्ये या IPO ला सुरुवातीपासून चांगला प्रतिसाद मिळतोय. सध्या ₹८३ चा प्रीमियम दिसतोय. म्हणजे जर ₹७४० वर शेअर वाटला, तर ग्रे मार्केटमध्ये तो सुमारे ₹८२३ पर्यंतच्या दरात हातावर हात जातोय. याआधी १८ जूनला हा प्रीमियम ₹१०४.५० पर्यंत गेला होता. म्हणजेच गुंतवणूकदारांचं वाढतं आकर्षण स्पष्ट दिसतंय.

IPOतील शेअर वाटपाचं नियोजनही निश्चित आहे. एकूण शेअर्सपैकी ५० टक्के भाग संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. ३५ टक्के भाग सर्वसामान्य किरकोळ गुंतवणूकदारांसाठी, आणि उरलेले १५ टक्के बिगर-संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी ठेवले आहेत. एवढंच नाही, तर कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांसाठीही २० कोटी रुपये किमतीचे शेअर्स वेगळे ठेवले आहेत.

HDB Financial Services चे काम काय?

HDB Financial Services ही NBFC (नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनी) क्षेत्रातील एक स्थिर आणि विश्वासार्ह नाव आहे. २०२३-२४ या आर्थिक वर्षात कंपनीने ₹२४६०.८४ कोटी निव्वळ नफा कमावला असून, त्याच कालावधीत महसूल ₹१४,१७१.१२ कोटी रुपये होता. ३० सप्टेंबर २०२४ रोजी संपलेल्या सहामाहीत कंपनीचा नफा ₹११७२.७० कोटी रुपये आणि महसूल ₹७८९०.६३ कोटी इतका होता. ही आकडेवारी पाहता, कंपनीचा आर्थिक गाभा भक्कम आहे.

IPO प्रक्रियेसाठी जेएम फायनान्शियल, बीएनपी परिबास, बोफा सिक्युरिटीज, गोल्डमन, एचएसबीसी, आयआयएफएल कॅपिटल यासारख्या आघाडीच्या इन्व्हेस्टमेंट बँका बुक रनिंग लीड मॅनेजर म्हणून नियुक्त झाल्या आहेत. त्यामुळे IPO प्रक्रियेतील पारदर्शकता आणि व्यावसायिकतेचं प्रमाणही अधिक विश्वासार्ह वाटतं.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!