लंडन : शरीर व मनाला तरतरी देणाऱ्या कॉफी सेवनाचा आणखी मोठा लाभ समोर आला आहे. हल्लीच झालेल्या एका अध्ययनातून कॉफी आणि पित्ताशयात तयार होणारे खडे यांच्यात संबंध असल्याचे आढळून आले आहे.
सुमारे एक लाख चार हजार लोकांवर करण्यात आलेल्या या अध्ययनामध्ये असे दिसून आले की, दररोज सहा कपांपेक्षा जास्त कॉफी पिणाऱ्या लोकांमध्ये कॉफी न पिणाऱ्यांच्या तुलनेत पित्ताशयात खडे तयार होण्याचा धोका २३ टक्क्यांनी कमी होतो.
शास्त्रज्ञांच्या माहितीनुसार, कॉफीचा प्रत्येक कप हा धोका तीन टक्क्यांपर्यंत कमी करतो. अर्थात या अध्ययनातून फक्त कॉफी पिण्याचा आणि पित्ताशयात खडे तयार होण्याचा धोका यांच्यातील संबंध समोर आला असल्याचे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.
कॉफी कशाप्रकारे पित्ताशयातील खड्यांचा धोका कमी करते, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. आता शास्त्रज्ञ अशा विविध शक्यतांवर अध्ययन करण्याच्या दिशेने विचार करत आहेत.