Shirdi News : एका वर्षात पैसे डबल करण्याचे आमिष दाखवून शिर्डीसह विविध जिल्ह्यातील शेकडो गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणारा आरोपी अत्यंत चतुर, चलाख आणि सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले आहे. या आरोपीवर मकोका अंतर्गत कारवाई करावी, या मागणीसाठी तसेच गुंतवणूकदारांचे पैसे आरोपीकडून वसूल करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे भाजप नेते डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी सांगितले.
याबाबत पत्रकात म्हटले, की सामान्य गुंतवणूकदारांनी मेहनतीच्या पैशांची गुंतवणूक केली होती. काहींनी खासगी सावकारांकडून कर्ज घेतले, तर काहींनी आयुष्याची सगळी पुंजी पणाला लावली; मात्र आरोपीने सर्वांचा विश्वासघात केला. ही एक संघटित गुन्हेगारी आहे. या आरोपीने व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करून त्यामध्ये आपले नातेवाईक, मित्र आणि वकील यांना सहभागी करून घेतले.

ग्रुपमध्ये कोणी नकारात्मक बोलत असेल तर त्याचे मत बदलवण्यासाठी या लोकांचा वापर केला जात होता. गेल्या डिसेंबरमध्ये शिर्डीतील एका हॉटेलमध्ये गुंतवणूकदारांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी मोठे आमिष दाखवून मोठ्या प्रमाणात रक्कम जमा करण्यात आली. त्यानंतर आरोपीने या रकमेची विल्हेवाट लावण्यास सुरुवात केली आणि गुंतवणूकदारांच्या संपर्कातून बाहेर गेला.
गुंतवणूकदारांच्या भावनांचे भांडवल करून आरोपीने कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली. खोटी आश्वासने देऊन तो सातत्याने पैसे उकळत राहिला. यापूर्वीच त्याच्यावर गुन्हे दाखल व्हायला हवे होते; मात्र त्याने आणि त्याच्या सहकाऱ्यांनी गुंतवणूकदारांना भावनिकदृष्ट्या गोंजारत गुन्हे दाखल होऊ दिले नाहीत. आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. मात्र, त्याच्याकडून गुंतवणूक केलेल्या रकमेचे पुढे काय झाले, याची माहिती मिळेपर्यंत कोणीही खचून जाऊ नये.
पोलिस आणि न्यायालयाच्या माध्यमातूनच पैसे परत मिळवण्याचा एकमेव मार्ग आता उरलेला आहे.आपली मोठी फसवणूक झाल्याचे सर्व गुंतवणूकदारांच्या लक्षात आले आहे. त्यामुळे सर्वांनी एकजुटीने आणि एकमताने जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रारी दाखल कराव्यात. तक्रारी दाखल झाल्याशिवाय पोलिसांची कारवाई प्रभावी होणार नाही. कोणाकडे पुरावे असतील, तर त्यांनी ते घेऊन तक्रार दाखल करावी. फक्त तक्रारदारांनाच गुंतवलेल्या रकमेवर हक्क सांगता येईल.