पैसे गुंतवा, तुम्हाला बँकेच्या व्याजापेक्षा जास्त पैसे मिळवून देतो, असे सांगून राशीन जवळील देशमुखवाडी येथील दाम्पत्याची वीस लाख रुपयांची फसवणूक केली. गुंतवलेले पैसे परत दिले नाहीत पण जीवे मारण्याची धमकी दिली.
या प्रकरणी कर्जत पोलिसांत कानगुडवाडी येथील पिता- पुत्रा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, यातील एक आरोपी जयेश कानगुडे याला अटक करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कर्जत तालुक्यातील देशमुखवाडी येथील नितीन नामदेव काळे यांनी कर्जत पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आमच्या जमिनीशेजारी कानगुडवाडीची शिव असून, तेथे पांडुरंग कानगुडे यांची जमीन आहे, यामुळे त्यांची व आमची चांगली ओळख होती.
पांडुरंग कानगुडे यांचा मुलगा जयेश कानगुडे याची राशीन गावात जे.के. इन्व्हेस्टर नावाची फर्म आहे. याद्वारे ते शेअर मार्केटिंगचे काम करतात, हे मला माहीत होते. सुमारे दोन वर्षांपूर्वी जयेश कानगुडे यांचे वडील पांडुरंग कानगुडे हे माझ्याकडे आले व म्हणाले,
आम्ही शेअर मार्केटिंगच्या माध्यमातून तुम्हाला बँकेच्या व्याजापेक्षा जास्त पैसे मिळवून देतो, त्यानंतर ते मला राशीन येथील त्यांच्या जे. के. इन्व्हेस्टर या फर्ममध्ये घेऊन गेले, तेथे जयेश कानगुडे बरोबर आमचे बोलणे झाले.
ते म्हणाले, तुम्ही आमच्या फर्ममध्ये गुंतवणूक करा, मी तुम्हाला बँकेच्या व्याजापेक्षा जास्त मोबदला देईल, असे सांगितले. दहा लाख रुपये सोळा महिन्यांसाठी गुंतवा, सोळा महिन्यानंतर सतरा लाख रुपये परत देतो, असे सांगितले.
पांडुरंग कानगुडे व जयेश कानगुडे यांच्यावर विश्वास ठेवून नितीन काळे यांनी जे.के. इन्व्हेस्टर फर्मच्या (पुणे) येथील भोसरी एमआयडीसी येथील आयसीआयसीआय बँकेच्या खात्यावर ३१ ऑगस्ट २०२३ रोजी त्यांच्या बँक खात्यातून आरटीजीएसद्वारे दहा लाख रुपये जमा केले.
त्यानंतर काही दिवसांनी जयेश कानगुडे व पांडुरंग कानगुडे माझ्याकडे आले व म्हणाले, तुमच्याकडे अजून काही पैसेअसतील तर ते आमच्या फर्ममध्ये गुंतवा, तुम्हाला चांगला परतावा देतो, यानंतर माझी पत्नी संगीता काळे यांनी त्यांच्या खात्यातून दहा लाख रुपये १६ आक्टोबर २०२३ रोजी आरटी जीएसद्वारे पाठवले.
त्यानंतर माझ्या नावे सतरा लाख व पत्नीच्या नावे सतरा लाख, असे दोन चेक आम्हाला दिले, ३१ डिसेंबर २०२४ रोजी चेक टाका व तुमची मूळ रक्कम व परतवा, असे ३४ लाख रुपये रक्कम काढून घ्या, असे सांगितले. हे दोन्ही चेक आमच्या बँकेच्या खात्यावर भरले असता, खात्यात पुरेशी रक्कम नसल्यामुळे ते दोन्ही चेक बाऊन्स झाले.
त्यानंतर आम्ही पांडुरंग कानगुडे व जयेश कानगुडे यांच्याकडे पैशाची मागणी केली असता, आम्हाला शिवीगाळ केली, तुमचे पैसे परत देऊ शकत नाही, असे सांगितले. आमच्या विरोधात काही तक्रार केली तर तुला ठार मारीन, अशी धमकी दिली.
यामुळे पांडुरंग कानगुडे व जयेश कानगुडे यांनी आमची फसवणूक करण्याच्या उद्देशानेच आमिष दाखवले व माझी वीस लाख रुपयांची फसवणूक केली आहे, म्हणून पांडुरंग कानगुडे व जयेश कानगुडे यांच्याविरुद्ध कर्जत पोलिसांत वीस लाख रुपये फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणातील एक आरोपी जयेश कानगुडे याला अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्याला १४ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास सपोनि. प्रदीप बोऱ्हाडे हे करत आहेत.