शेअर मार्केटच्या नावाखाली कोट्यावधींचा गंडा घालणाऱ्या बिग बुल नवनाथ आवताडेच्या विरोधात गुंतवणूकदार उतरले रस्त्यावर, मुख्यमंत्र्याची भेट घेणार

Published on -

श्रीगोंदा- श्रीगोंदा, पारनेर तसेच राज्यातील विविध भागांत शेअर मार्केटच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. नवनाथ अवताडे हा संचालक असलेल्या सर्व कंपन्यांची तातडीने चौकशी करून सर्व मुख्य आरोपींना तातडीने अटक करावी. आरोपींनी गोळा केलेली गोरगरिबांची रक्कम कुठे आहे, याची चौकशी करून ती रक्कम ताब्यात घेऊन गुंतवणूकदारांना परत देण्यात यावी.

जिल्ह्यात या कंपन्यांसारख्या असंख्य कंपन्या आजही कार्यरत असून, त्यांचीदेखील चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी. एवढ्या दिवस या कंपनीच्या कोणाच्या आशीर्वादाने लोकांची फसवणूक करत होत्या याचीदेखील चौकशी व्हावी. आदी मागण्यांसाठी पंचायत समितीचे माजी सदस्य राजेंद्र म्हस्के यांनी सोमवार (दि. १४) जुलैपासून श्रीगोंदा तहसील कार्यालयसमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.

या उपोषणादरम्यान राजेंद्र म्हस्के यांनी सांगितले की, सिस्पे, इन्फनाईट बिकॉन यांसारख्या नवनाथ अवताडे संचालक असलेल्या माध्यमातून सर्व कंपन्यांच्या श्रीगोंदा तालुक्यात आणि परिसरात कोट्यवधी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. या कंपन्यांचे मुख्य सूत्रधार नवनाथ आवताडे व त्याचे इतर संचालक अगिस्ती मिश्रा, ययाती मिश्रा, शुभम अवताडे, गौरव सुखदेवे, राहुल काळाखे, प्रसाद कुलकर्णी, विनायक मराठे, सचिन खडतारे, ओंकार भुसारे, संदीप दरेकर यांना तालुक्यातील सहकार्य करणारे संदिप रोडे, पांडुरंग खामकर, भरत खामकर, झुंझार इतर सहकाऱ्यांनी जादा परताव्याचे आमिष दाखवून शेकडो गुंतवणूकदारांकडून पैसे गोळा केले. मात्र, कालांतराने कोणालाही ना परतावा मिळाला, ना मूळ रक्कम मिळाली. लोकांनी कर्ज काढून गुंतवणूक केली आहे.

अवताडे व त्याच्या सहकाऱ्यांनी तालुक्यातील गोरगरीब लोकांना लुटले आहे. परंतु प्रशासनाचे त्याच्याकडे लक्ष नाही. प्रशासनाने कोणतीही ठोक भूमिका घेतली नाही. या घोटाळ्यामुळे अनेक कुटुंब रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाहीत. गोरगोरीब लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी ही लढाई शेवटपर्यंत लढणार आहे.

उपोषणस्थळी राजकीय व सामाजिक पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन पाठिंबा दिला. उपोषणात फसवणूक झालेले गुंतवणूकदार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

याप्रश्नी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार

शेअर मार्केटच्या नावाखाली महाराष्ट्रातील हा सर्वाधिक मोठा आर्थिक घोटाळा असून, यामध्ये श्रीगोंदा तालुक्यातील जवळपास पन्नास हजार लोकांची फसवणूक झाली असून, या प्रश्नी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार, असे म्हस्के यांनी सांगितले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!