शिर्डी- कोट्यवधी रुपयांचा गुंतवणूक फसवणूक घोटाळा उघडकीस आल्यानंतर, श्री साईबाबा संस्थानच्या चार कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. ‘ग्रो मोअर’ या गुंतवणूक कंपनीच्या माध्यमातून शिर्डीतील भूपेंद्र सावळे व इतर आरोपींनी राज्यभरातील गुंतवणूकदारांना फसवले. या गंभीर प्रकरणात संस्थानच्या कर्मचाऱ्यांचाही सहभाग उघड झाल्याने खळबळ उडाली आहे.
राहाता येथे दाखल असलेल्या गुन्ह्यात भूपेंद्र सावळे, राजाराम सावळे, सुबोध सावळे, संदीप सावळे आणि भाऊसाहेब थोरात यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. अटक करण्यात आलेल्या भूपेंद्र सावळेला २५ तारखेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली असून, उर्वरित आरोपी अद्याप फरार आहेत. विशेष बाब म्हणजे या आरोपींपैकी चौघे साईबाबा संस्थानचे कर्मचारी असून, त्यांनी इतर सहकाऱ्यांनाही या फसवणुकीत गुंतवले.

यामुळे संस्थानच्या विश्वासार्हतेला तडे गेले असून, पवित्र सेवाभावी संस्थेच्या नावलौकिकावर काळोख पसरवणारी ही घटना ठरली आहे. या पार्श्वभूमीवर साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. गोरक्ष गाडीलकर यांनी तातडीने आणि ठोस निर्णय घेत या चौघा कर्मचाऱ्यांना सेवेतून निलंबित केले. ही माहिती त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना दिली. डॉ. गाडीलकर यांनी स्पष्ट केले की, संस्थेच्या नावलौकिकाला धक्का पोहचवणाऱ्यांविरोधात कुठलाही समंजसपणा ठेवला जाणार नाही. या प्रकरणात आणखी आरोपींची नावे समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
ग्रो-मोअर कंपनीच्या कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्यात साईबाबा संस्थानचे कर्मचारी सहभागी असल्याची बाब धक्कादायक आहे. संस्थानच्या विश्वासार्हतेला आणि सेवाभावी कार्याला धक्का पोहोचवणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध तातडीने निलंबनाची कारवाई केली गेली आहे. मात्र ग्रो मोअरचा संचालक भूपेंद्र सावळे याला अटक करून त्याच्याकडून दीड कोटी रुपये वसूल केल्याचा आरोप पोलीस अधिकाऱ्यांवरही असून, त्या प्रकरणाचा तपास आणि संबंधित पोलिसांवर कारवाई कधी होणार? असा सवाल सुज्ञ नागरिक उपस्थित करत आहेत.