मुंबई- एसटी महामंडळाच्या उत्पन्नात कमालीची घट होत असून भाडेवाढीच्या तुलनेत अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याचा निष्कर्ष काढून ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या पाच दिवसांत २५ कोटी रुपये इतकी उत्पन्नात तूट आल्याची माहिती प्रसार माध्यमांना देण्यात आली होती. पण महामंडळाकडून बातमीचा खुलासा करताना तुटीऐवजी ‘तोट्याचा’ उल्लेख करण्यात आला असून एसटीच्या उत्पन्नात वाढ होऊन ती अडचणीतून बाहेर निघावी, या चांगल्या उद्देशाने दिलेल्या माहितीचा विपर्यास केला जात असल्याचा आरोप महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस संघटनेकडून करण्यात आला.
महामंडळाकडून दिलेला खुलासा म्हणजे उपाययोजना करण्याऐवजी कांगावा करण्याचा प्रकार असल्याची टीका संघटनेचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केली आहे.

एसटीने महाराष्ट्राला खूप दिले आहे. त्यामुळे तिच्या विश्वासार्हतेला तडा जाईल किंवा संभ्रम निर्माण होईल, अशी कुठलीही कृती कधीच होणार नाही. एसटीही नुसती लोकवाहिनी नव्हे, तर महाराष्ट्राची रक्तवाहिनी आहे. फायदा किंवा तोट्याचा विचार न करता बहुजन
हिताय… बहुजन सुखाय… या ब्रीद वाक्याप्रमाणे महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेची सेवा करणे, हेच एसटीचे प्रमुख ध्येय राहिले आहे.
पण आर्थिक अडचणीमुळे अनेक प्रश्न प्रलंबित असून ती अडचणीतून बाहेर निघावी, या चांगल्या हेतूने माध्यमांना दिलेल्या माहितीचा विपर्यास करणारा विसंगत खुलासा द्यायला नको होता. तिची उन्नती व प्रगती व्हावी, असे प्रयत्न करण्यात आले पाहिजेत; पण दुर्दैवाने वास्तव स्वीकारण्याचा मोठेपणा दाखवण्याऐवजी चांगल्या हेतूचा अपभ्रंश केला जात आहे.
महामंडळातील काही अधिकारी फक्त टोपल्या टाकू काम करत आहेत. त्यामुळेच ही परिस्थिती निर्माण झाली आहे. दर महिन्याला सवलत मूल्य प्रतिपूर्ती रकमेतून वेतन देण्यात येते; पण त्या व्यतिरिक्त जादा उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न केले जात नाहीत. त्यामुळे आर्थिक स्थिती चांगली नसल्याने कर्मचाऱ्यांना वेतनवाढीचा फरक मिळालेला नाही.
महागाई भत्त्याचा फरक मिळालेला नाही. साधारण २५०० कोटी रुपये इतकी पीएफ व ग्रच्युइटी रक्कम संबंधित ट्रस्टकडे भरणा करण्यात आलेली नाही. मध्यंतरी सर्व कर्मचारी संघटनांची बैठक राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत घेण्यात आली होती. त्यांनी सुद्धा यावेळी बोलताना म्हटले होते, महामंडळाने स्वतःचे उत्पन्नसुद्धा मिळवले पाहिजे, त्याचप्रमाणे मंत्रालयातील अर्थ खात्याचे व परिवहन खात्याचे अधिकारी सुद्धा वारंवार विविध बैठकांमध्ये महामंडळाने स्वतःसुद्धा उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे सांगत आहेत.
तरीही स्वतः काही न करता स्वतःचे अपयश लपवण्यासाठी खुलाशात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे नाव टाकून व महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक माधव कुसेकर यांचे नाव टाकून खुलासा देणे म्हणजेच महामंडळाच्या काही अधिकाऱ्यांकडून स्वतःचा बचाव करण्यासाठी ‘चोर चोर म्हणून भुई थोपटण्याचा’ प्रकार असल्याचे बरगे यांनी म्हटले आहे.