महायुती सरकारच्या भ्रष्ट कारभाराविरोधात शिवसेना ठाकरे पक्षाचे राज्यव्यापी जनआक्रोश आंदोलन

Published on -

मुंबई- महायुती मंत्र्यांवरील भ्रष्टाचाराच्या आणि सरकारमधील गैरव्यवहारांच्या आरोपांविरोधात शिवसेना (ठाकरे) पक्षाकडून ११ ऑगस्ट रोजी राज्यव्यापी महाराष्ट्र जनआक्रोश आंदोलन पुकारण्यात आले आहे. राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालये आणि मुंबईतील सर्व विभागांमध्येही हे आंदोलन होणार आहे.

दादरच्या शिवाजी पार्क येथील स्व. मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याशेजारी होणाऱ्या आंदोलनात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे स्वतः सहभागी होणार आहेत.

महायुती सरकारमधील काही मंत्र्यांवर विरोधकांकडून भ्रष्टाचाराचे तसेच गैरव्यवहाराचे सातत्याने आरोप केले जात आहेत. त्यामध्ये समाजकल्याण मंत्री संजय शिरसाट यांचे हॉटेल खरेदी प्रकरण, पैशाच्या बॅगेचे व्हिडीओ प्रकरण तसेच १५०० कोटींच्या गैरव्यवहाराचे आरोप, तत्कालीन कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचे रमी प्रकरण आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांबाबत त्यांनी केलेले वादग्रस्त वक्तव्य, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या मातोश्रीच्या नावे असलेला डान्स बार, राज्यातील कथित हनीट्रॅप प्रकरणात मंत्र्यांचा आणि अधिकाऱ्यांचा असलेल्या सहभागावरून आंदोलनाच्या माध्यमातून राज्य सरकारला धारेवर धरण्याचा शिवसेना ठाकरे पक्षाचा प्रयत्न राहणार आहे.

या आंदोलनाला महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) यांच्यासह इतर मित्रपक्षांचाही पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. या आंदोलनामुळे महायुती सरकारवर दबाव वाढण्याची चिन्हे आहेत.

महाराष्ट्राला नकोय भ्रष्ट कारभार !

शिवसेना (ठाकरे) पक्षाकडून सोमवार, ११ ऑगस्ट रोजी होणाऱ्या ‘महाराष्ट्र जनआक्रोश’ आंदोलनाचा टीझर जाहीर करण्यात आला. या टीझरमध्ये सरकारच्या भ्रष्टाचार, मुजोरपणा आणि गैरकारभाराविरोधात संघर्षाची हाक देण्यात आली आहे. महाराष्ट्राला नकोय सत्ताधाऱ्यांचा कलंकित आणि भ्रष्ट कारभार… नकोय मुजोरपणाचा, काळ्या धंद्याचा भार!, हकालपट्टीसाठी त्यांच्या लावू आता ताकद, एकजुटीने करू जनआक्रोशाचा वार!, अशा आशयाची घोषणा असलेल्या या टीझरमध्ये आंदोलकांचा आक्रोश दाखवण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe