FASTag Rule:- 15 ऑगस्ट 2025 म्हणजेच स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या माध्यमातून नॅशनल हायवे म्हणजेच राष्ट्रीय महामार्गावर जे प्रवासी प्रवास करतात त्यांच्यासाठी एक दिलासादायक निर्णय घेण्यात आला असून कालपासून वार्षिक फास्टटॅग पास सुरू करण्यात आलेला आहे. यासाठी प्रवाशांना 3000 रुपये वर्षासाठी भरावे लागणार आहेत व दोनशे वेळा या पासच्या माध्यमातून प्रवाशांना टोल ओलांडता येणार आहे. चला तर मग आपण या लेखात बघू की या वार्षिक पासचे नियम कसे आहेत व कोणत्या ठिकाणी हा तुम्हाला वापरता येणार आहे?
वर्षाला 3000 भरा आणि 200 वेळा टोल ओलांडा
प्रत्येकाला माहित आहे की जेव्हा आपण प्रवास करतो आणि टोल ओलांडतो तेव्हा फास्टटॅगमुळे पैसे कापले जातात. परंतु जर तुम्ही हा वार्षिक पास घेतला आणि एका वेळेस तीन हजार रुपये खर्च केला तर एका वर्षामध्ये तुम्हाला दोनशे वेळा टोल ओलांडता येणार आहे व एका टोलसाठी सरासरी खर्च फक्त पंधरा रुपये इतका येणार आहे. दुसरे महत्त्वाचे म्हणजे वाहनधारकांना हा पास घेणे अनिवार्य नाही. तसेच याबद्दल सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला हा पासचा वापर फक्त राष्ट्रीय महामार्ग आणि राष्ट्रीय द्रुतगती महामार्गांवर वापरता येणार आहे. या व्यतिरिक्त राज्य महामार्ग तसेच महानगरपालिका टोल रस्ते किंवा यमुना एक्सप्रेस वे, मुंबई ते पुणे एक्सप्रेस वे किंवा आग्रा-लखनऊ एक्सप्रेस सारख्या खाजगी रस्त्यांवर वापरता येणार नाही.

कोणत्या वाहनांसाठी वापरता येईल हा पास?
या पासचा वापर प्रवाशांना कार, जीप आणि व्हॅन इत्यादी बिगर व्यावसायिक वाहनांसाठी वापरता येणार आहे व खाजगी वाहनांसाठी वापरता येणार आहे. ट्रक किंवा बस किंवा टॅक्सी यासारखे व्यावसायिक वाहनांना मात्र या पासचा वापर करता येणार नाही. तसेच महत्त्वाचे म्हणजे हा पास वापरण्यासाठी तुमचे वाहन गव्हर्मेंटच्या खाजगी डेटाबेसमध्ये खाजगी वाहन म्हणून रजिस्टर असणे गरजेचे आहे. हा पास तुम्हाला तुमच्या चालू फास्टटॅगवर सक्रिय करता येणार असून यासाठी फक्त तुमचा चालूचा फास्टटॅग ब्लॅक लिस्टमध्ये नसावा आणि तो वाहन नोंदणी क्रमांकाशी लिंक असणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे ज्या वाहनाचा नोंदणी क्रमांक आणि फास्टटॅग सक्रिय करण्यात आलेला आहे त्यासाठीच हा पास वापरता येणार आहे.